दही- खिचडी, झुणका-भाकर अन् माठातील गार पाणी

प्रशांत देशमुख, वर्धा

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उद्या येथे (मंगळवार) येणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्व बडय़ा नेत्यांसाठी दही-खिचडीसोबतच झुणका-भाकर हा वैदर्भीय जेवणाचा ‘मेन्यू’ ठरवण्यात आला आहे. तसेच आश्रमात बाटलीतील पाण्यास मनाई असल्याने सर्वाना माठातील गार पाण्यावरच तृष्णा भागवावी लागणार आहे.

महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीचे निमित्त साधून सेवाग्राममध्ये होणाऱ्या कार्यकारिणीसाठी राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे उद्या सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरने आगमन होत असून उर्वरित मान्यवर नेते खासगी बसने वध्रेला पोहोचतील. आगमनानंतर आश्रमातील प्रार्थना, वृक्षारोपण कार्यक्रमास मान्यवर हजेरी लावतील.

पूर्वतयारीसाठी आज येथे आलेले मल्लिकार्जून खरगे, अशोक गहलोत तसेच अन्य मान्यवरांनी दुपारचे भोजन नई तालीम भोजनगृहात घेतले. आश्रमात कोहळय़ाची भाजी ठरलेली असते. आज खरगे यांनी ही भाजी, वरणभात, आलू-मटर असे साधे जेवण घेतले. आजचे जेवण प्रकृतीयोग्य व सात्विक असल्याचे सांगितले. कोणतेही राजकीय मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.

जेवणासाठी चटई

सर्व मान्यवरांची जेवणाची व्यवस्था नई तालीमच्या भोजनगृहात करण्यात आली आहे. दही-खिचडी, झुणका-भाकर, ठेचा, ताक व गुड-दलिया (लापशी) असा भोजनाचा बेत आहे. चटईवर बसूनच जेवण करण्याची सोय केलेली आहे. आश्रमातील स्वयंपाकगृहात मुख्य व्यवस्थापक गणराज यांच्या देखरेखीखाली भोजन तयार करण्यात येणार आहे. कार्यकारिणीच्या ५१ सदस्यांशिवाय १६ निमंत्रितांची भोजन व्यवस्था झाली आहे. भोजनासाठी साधारणत: शंभर रुपये प्रती व्यक्ती असा दर आकारला जातो. येथे स्वच्छता व शुद्धता नेहमीच पाळली जाते. बैठकीसाठी वेगळे असे काही येथे करावे लागणार नाही, असे व्यवस्थापक समितीकडून सांगण्यात आले.