लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कोणत्याही संघात ‘महसूलबाह्य’ खेळाडू आढळून आल्यास त्या संघाला स्पर्धेतून अपात्र ठरवतानाच ५ हजारांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचे या स्पर्धेच्या सर्वसाधारण नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धकांनी स्पर्धेदरम्यान आपल्या मूळ कार्यालयाचे ओळखपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे.

‘अविरत महसूल-काल, आज आणि उद्याही’ या लक्षवेधी घोषवाक्याखाली राज्यशासनाचा कणा समजला जाणार्‍या मोठ्या विभागातील खेळाडू आणि कलावंत शुक्रवारपासून ऐतिहासिक नांदेडमधील वेगवेगळ्या मैदानांसह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारलेल्या सुसज्ज मंचावर बघायला मिळणार असून नांदेड जिल्हा प्रशासनाने या भव्य क्रीडा-कला उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. अपर जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या प्रमुख अधिकार्‍यांवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी सकाळी येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी स्टेडियमच्या भव्य-हिरव्यागार पटांगणावर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विविध खात्यांचे मंत्री आणि आमदार-खासदारांच्या उपस्थितीत होणार असून राज्याच्या सहा महसुली विभागांसह नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे विभाग अशा सात विभागांचे दीड हजारांहून अधिक खेळाडू आणि कलावंत आपापल्या विभागांच्या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह गुरुवारी वार्ताहरांशी संवाद साधला. स्पर्धेचे एकंदर स्वरूप आणि प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती या संवादातून दिली जात असतानाच स्पर्धेसाठीच्या नियमावलीतील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. त्यानुसार या स्पर्धेत कोतवालापासून विभागीय आयुक्तांपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकेल, पण महसूल विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या अन्य विभागाच्या कर्मचारी-अधिकार्‍यांना कोणत्याही महसूल विभागाच्या संघाकडून सहभागी होता येणार नाही.

स्पर्धेतील वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रत्येक खेळाडूस जास्तीत जास्त तीन आणि सांघिकमध्ये दोन क्रीडा प्रकारात भाग घेता येणार आहे. स्पर्धेच्या या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित खेळाडूस स्पर्धेतून बाद केले जाणार आहे. स्पर्धेदरम्यान एखाद्या संघास तक्रार करावयाची असल्यास ती सामना संपल्यानंतर ३० मिनिटांच्या आत तक्रार निवारण समितीकडे करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आक्षेप-तक्रार दाखल करताना ५०० रूपये अनामत जमा करावी लागणार आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास अनामत रक्कम परत करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे एकंदर चार भाग करून त्यातील गुण निश्चित करण्यात आले आहेत. त्यातून सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार मिळून सर्वसाधारण विजेतेपद व उपविजेतेपद जाहीर करण्यात येणार आहे. अलीकडे जालना येथे झालेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद नांदेड जिल्ह्याने प्र्राप्त केले होते. छ.संभाजीनगर महसुली विभागाच्या आठ जिल्ह्यातील खेळाडूंमधून या विभागाचा संघ स्पर्धेसाठी सज्ज झाला असल्याचे महेश वडदकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level revenue sports competition if player is found to be outside revenue team will be fined and disqualified mrj