Sudhir Mungantiwar : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं होतं. त्यात तिसरी भाषा ही हिंदी किंवा इतर कुठलीही होती. मात्र त्या धोरणाला राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवला. अधिवेशनाच्या एक दिवस आधी दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आले. ज्यानंतर ५ जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही त्यांच्या भूमिका मांडल्या. आता राज आणि उद्धव ठाकरेंबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. नवे विद्यार्थी आले तरीही मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवर परिणाम होत नसतो असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह

मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या क्षणामुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला.त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठी शक्ती एकत्रित आली असून मराठीजनांमधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती पूर्ण झाल्याचं दिसून आली. मराठी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी वज्रमूठ दाखवून दिली तीच एकीची वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये कायम राहावी आणि दोन बंधूंनी एकत्रितपणे आगामी निवडणुकींचा आणि राजकीय आव्हानांचा मुकाबला करावा अशी लोक भावना असल्याचं अनेक नेते म्हणत आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“दोन भाऊ हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. नवीन विद्यार्थी आल्याने मेरिटच्या विद्यार्थ्यावर काही परिणाम होत नाही तसा आमच्यावरही काही परिणाम होणार नाही. त्यांनी आपला अभ्यास करायचा. नव्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करायचा आहे. सत्ता हे आमच्या पक्षाचं कधीच ध्येय नव्हतं. सत्तेसाठी आमच्या पक्षाला काहीही करायची आवश्यकता नाही. दोन भाऊ एकत्र आले आहेत तर भाजपाच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही.” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. तसेच राज ठाकरे यांनी देखील या भाषणात बोलताना भारतीय जनता पक्षाला सूचक इशारा दिला. या मेळाव्यात व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधू होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांचं आधी भाषण झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. या मेळाव्याला महाविकास आघाडीतले नेतेही उपस्थित होते. दरम्यान मुनगंटीवार यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना नवे विद्यार्थी म्हटलं आहे.