केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं होतं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते, सुजात आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणे काय म्हणाले होते?

“मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. मनोज जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे,” असं नारायण राणेंनी म्हटलं.

हेही वाचा : मराठा आरक्षण न मिळाल्यास काय होणार? मनोज जरांगेंनी सांगितला ‘प्लॅन’, सरकारला अंतिम इशारा देत म्हणाले…

“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळा आहे,” असं नारायण राणे म्हणाले.

यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सुजात आंबेडकरांनी म्हटलं, “सरकारवर दबाव येत आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा आरक्षणावरील विषय भरकवटायचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण दिलं पाहिजे. याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे-पाटलांशी चर्चा केली आहे.”

हेही वाचा : VIDEO : “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध, मी कधीही…”, एकनाथ शिंदेंची ग्वाही

वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन का करत नाही? या प्रश्नावर सुजात आंबेडकर म्हणाले, “वंचित आघाडी महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून समोर येत आहे. कारण, बाकींच्या पक्षाचा कुठलातरी गट सत्तेत आहे. पण, आम्हाला वाटतं जरांगे-पाटलांचं नेतृत्व पुढे यायला हवं. आम्ही जरांगे-पाटलांना बळ आणि पाठिंबा देतोय. तसेच, स्वत:चं आंदोलन न करता, जरांगे-पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करतोय.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sujat ambedkar allegation narayan rane divert maratha reservation because pressure maha govt ssa