परभणी: पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे आज गुरुवारी (दि.१७) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगीमार्गे परत परभणीकडे येत होते. त्यांना अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर भर उन्हात एक ८० ते ९० वर्षे वयोगटातील वृद्ध महिला दिसली. रखरखत्या उन्हात वार्धक्याने जर्जर झालेल्या या आजीच्या पायातील चपला अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, रस्त्याच्या एका बाजूने या आजी रखडत चालल्या होत्या. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्यांच्याकडे नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतःजवळ असलेले पाणी या आजीला प्यायला दिले आणि त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत या आजींना सावलीत नेऊन बसवले.एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क साधला. या आजीबाई आजारी असल्याचे आणि त्यांना नीट बोलताही येत नसल्याचे परदेशी यांना जाणवले. त्यांनी या आजीला उपचारासाठी हलविण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकिय वाहनातून पाठविले. पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले.

पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या माणुसकीचे दर्शन तर या निमित्ताने घडलेच आणि अंबड पोलीस यांनी हातभार लावून वृद्ध आजीला अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केले आहे. या आजी अंबड तालुक्यातील बेलगांव येथील असून, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

(छत्रपती संभाजीनगरहून परभणी कडे येत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना एक वृद्ध महिला भर उन्हात रस्त्याने रखडत चालल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वाहन थांबवले आणि या आजारी महिलेला पोलिसांच्या दुसऱ्या वाहनातून सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचवले.)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superintendent of police ravindra singh pardeshi supported the elderly woman parbhani news amy