भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? “शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाह यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. “आज भाजपाचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली”, असं प्रत्युत्तरही सुप्रिया सुळे यांनी दिलं. हेही वाचा - “भाषण चुरचुरीत करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर! “ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ते आज भाजपाबरोबर” यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीकाही केली. “भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. महाराष्ट्रच नाही, तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्यापैकी ९० टक्के नेते आज भाजपाच्या बरोबर आहेत”, असे त्या म्हणाल्या. “उद्धव ठाकरेंवरच्या टीकेबाबतही दिली प्रतिक्रिया पुढे बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. “उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाकडे मुद्दे नाहीत. त्यांनी त्यांचा पक्ष फोडला. त्यांचे नेते पळवून नेले, त्यांच्यावर इतका अन्याय झाला. आता त्यांच्यावर बोलण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे अमित शाह यांच्याकडून अशाप्रकारे टीका केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हेही वाचा - उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका अमित शाह यांनी नेमकं काय म्हटलं होतं? पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते.