Premium

“देवेंद्रभाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो”, नवाब मलिकप्रकरणी सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाली.

Sushma Andhare on Devendra Fadnavis (2)
सुषमा अंधारे काय म्हणाल्या? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आज ते पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. तसंच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आजही ते सत्ताधारी बाकावर बसतात की विरोधकांच्या बाकावर याची चर्चा रंगली होती. नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाली. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुरुंगात गेल्यानतंरही तुम्ही त्याचं मंत्रिपद काढायला का तयार नव्हता याचं आधी उत्तर द्या. नवाब मलिकांच्या या मुद्दयावरून तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. याचे पडसाद विधानसभेच्या बाहेरही उमटले. तर, सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

हेही वाचा >> नवाब मलिक सत्ताधारी बाकावर! विधान परिषदेत खडाजंगी, देशद्रोहाच्या आरोपावरून फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

“पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!”, अशी खोचक टीप्पणी सुषमा अंधार यांनी एक्सवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushma andhare taunt to devendra fadnavis over nawab malik case sgk

First published on: 07-12-2023 at 17:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा