गारपीटग्रस्त भागातील शेतीपिकांचे फेरपंचनामे करावेत, देशमुख बोरगाव येथील गारपीटग्रस्त शेतक-यांवर तलाठय़ाच्या फिर्यादीवरून दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, तसेच पुरवठा विभागातील अनागोंदी कारभार थांबवावा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट येथील तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा चालवला असताना तहसीलदार व नायब तहसीलदार गैरहजर राहात असलेल्या संतप्त शेतकरी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले.
संघटनेचे तालुकाध्यक्ष स्वामिनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयास कुलूप ठोकल्यानंतर त्याच ठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलनही केले. गेल्या फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात गोंधळ झाला असून अनेक शेतक-यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले नाहीत. तलाठय़ांकडे पाठपुरावा केला असताना सरकारी खाक्या दाखवून उलट, गारपीटग्रस्त शेतक-यांविरुद्धच फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतक-यांना न्याय मिळणे दुरापास्त झाल्याचा आरोप हरवाळकर यांनी केला.
या आंदोलनात गुंडू याळवार, धानप्पा गोळ्ळे, मकबूल मुजावर, चन्नप्पा कामशेट्टी, मौलाली पठाण, विठ्ठल पाटील, शांतय्या स्वामी, सोमशंकर जमशेट्टी, बसवराज बाके आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. दरम्यान, तहसीलदार गुरुलिंग बिराजदार यांनी तहसील कार्यालयात अधिकारी गैरहजर नव्हते, तर सोलापुरातील प्रशासकीय बैठकीमुळे अक्कलकोटला परतण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani stroked lock to akkalkot tehsil office