अलिबाग : लाडकी बहिण योजनेतील लाभार्थीं महिलांना ई केवायसी करण्याचे निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. मात्र या ई केवायसी प्रक्रीयेत तांत्रिक अडचणींचा खोडा येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर ग्रामिण भागातील महिलांना कनेक्टीव्हिटीची अडचण जाणवत आहे.
राज्यभरातील २ कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे. यातील पात्र लाभार्थी महिलांची राज्यसरकारने पडताळणी सुरु केली आहे. सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. ही प्रक्रीया सहज, सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी लाडकी बहिण योजनेच्या संकेतस्थळ विकसीत केले आहे. या संकेत स्थळाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास सांगण्यात आले आहेत.
मात्र या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात आहेत. ग्रामिण भागात कनेक्टीव्हिटीचा अडसर असल्याने महिलांना ई केवायसी प्रक्रीया करता आलेली नाही. तर ई केवायसी प्रक्रीया करतांना ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. अनेक महिलांनी संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. संकेतस्थळ दिवसा चालत नाही, रात्रीच चालते असेही सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये योजनेचा लाभ आगामी काळात मिळेल अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान ई केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या या तांत्रिक अडचणींबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणींची महिला व बाल विकास विभागाकडून गंभीर दखल घेतली आहे. तज्ञांच्या माध्यमातून त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे काम सध्या सुरू आहे. या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.