सातारा: सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख जिल्ह्यातील गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अनेक अधिकारी आजपासून दोन दिवस महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ५६ गावांत जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन पाहणी करण्यात येणार आहे. दुर्गम कांदाटी खोऱ्यात प्रथमच असे संपूर्ण प्रशासन जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोरे हे राज्यातील एक दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. कोयना उर्फ शिवसागर जलाशयालगतचा हा भाग जैवविविधतेने संपन्न आहे. या अशा दुर्गम भागात सातारा जिल्हा परिषदेचे संपूर्ण प्रशासन पोहोचण्याची ही स्वातंत्र्यानंतर पहिलीच वेळ आहे. सुरुवातीला या दौऱ्यात जाण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. मात्र, प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या दौऱ्याचे नेतृत्व करणार असल्याने सर्वांना सुटी दिवशीही जाण्याचा पर्याय राहिला नाही. दुर्गम आणि उपेक्षित भागातील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी, वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

हा भाग पूर्णतः दुर्गम आणि डोंगरी आहे. या भागात पोहोचण्यासाठी रस्तेही नाहीत. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी दिसत असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी ही वणवण करावी लागते. या भागातील ग्रामस्थांना महाबळेश्वर, वाईमार्गे दीडशे किलोमीटरचा पल्ला पार करून साताऱ्याला पोहोचावे लागते अन्यथा शिवसागर जलाशयातील तरफेतून (बोटीतून) बामनोलीमार्गे साताऱ्याला पोहोचावे लागते. या भागातील अनेक लोक अशिक्षित आणि गरीब आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना महाबळेश्वर, पाचगणी अथवा पुणे, मुंबई, ठाणे परिसरात जावे लागते. दुर्गम कांदाटी खोऱ्यात प्रथमच असे संपूर्ण प्रशासन जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

विविध योजनांचा आढावा

या कांदाटी खोरे भागातील ५६ गावांत शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. याची पाहणी हे अधिकारी करणार आहेत. शुक्रवारपासून हा अभ्यासदौरा सुरू होत आहे. शनिवारी दौरा संपणार आहे. या दौऱ्यात घरकुलांचे भूमिपूजन, शाळांची पाहणी, आरोग्य केंद्रांना भेट, जलजीवन मिशन कामाची पाहणी, अंगणवाड्यांना भेट, मधाचे गाव प्रकल्पास भेट आणि चर्चा, तसेच महिला बचत गटांचा मेळावाही घेण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The entire administration of satara zilla parishad in the remote kandati valley study tour for two days from today ssb