वाई: महा पुरुषांचा अपमान करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारा मुख्य आरोपी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.दुसर्‍याच्या इन्स्टाग्रामवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून नामानिराळा राहू पाहणार्‍या ‘त्या’ शिवद्रोही आरोपीला पकडण्यात सातारा पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे.कोणताही पुरावा नसताना, कोणीही साक्षीदार नसताना केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंधरा दिवसापूर्वी सातारा शहरात समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश आल्यामुळे सातार्‍यात तणावपूर्ण वातावरण झाले होते. यासंदर्भात १५ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ज्या इन्स्टाग्रामवरून संदेश प्रसारित झाला त्याचा शोध घेऊन तात्काळ अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. या मुलाला ताब्यात घेतल्यानंतरही त्याचे इन्स्टाग्राम वरून तांत्रिक माहितीच्या आधारे दुसरेच कोणीतरी संदेश प्रसारित करत होते. पोलिसांनी संबंधित मुख्य आरोपीला शोधून कडक शासन करावे अशी जोरदार मागणी सातार्‍यातून केली जात होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली होती .हा आक्षेपार्ह संदेश प्रसारित झाल्यानंतर शहरातील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली होती व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला होता. शहरात तणावपूर्ण वातावरण होते कारवाईची मागणी करणाऱ्या आंदोलकांना धमकीचे संदेश आले होते.

हेही वाचा >>>जालन्यात मराठा आक्रोश मोर्च्यावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

त्यामुळे हा गुन्हा उघडकीला आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्याकडे वर्ग केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पदके तयार करून त्यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत माहिती मिळवून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात न्यायालयाचा आदेश असल्यामुळे संशयीताचे नाव उघड करू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती समीर शेख यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The main accused who spread offensive messages on social media is in custody in satara amy