छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. येथील किराडपुरा भागात दगडफेकीची घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. जमावाने पोलिसांच्या आणि सामान्य नागरिकांच्या गाड्या जाळल्या. किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात दोन गटांमध्ये सुरुवातीला घोषणा देण्यावरून बाचाबाची झाली. याचं रुपांतर मोठ्या राड्यात आणि दंगलीत झालं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सध्या तिथलं वातावरण शांत झालं असलं तरी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळी किराडपुरा परिसराची पाहाणी केली. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. दानवे म्हणाले की, संपूर्ण परिसरात आपण शांतता ठेवली पाहिजे. पण हे का घडलं? हा प्रकार घडवणारे लोक कोण आहेत? याकडे लक्ष दिलं पाहिजे. गेल्या महिनाभरापासून आम्ही सातत्याने म्हणतोय या शहरातलं वातावरण खराब करून लोकांच्या मनात विष कालवलं जात आहे. मुस्लीमांच्या मनात हिंदूविरोधी आणि हिंदूंच्या मनात मुस्लीमविरोधी विष कालवलं जात आहे.

मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १० ते १५ दिवस आंदोलन करते. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत त्यांची आंदोलनं सुरू असतात. पोलीस त्याची काहीच दखल घेत नाहीत, कोणावरही कारवाई करत नाहीत. या परिस्थितीत पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत. संरक्षण करणाऱ्यावंर हात उचलले जातात ते हात पोलिसांनी तोडून टाकले पाहिजेत. या दंगलीमागे एआयएमआयएम आणि राज्य सरकारमधले दोन पक्ष (भाजपा आणि शिंदे गट) आहेत.

हे ही वाचा >> संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

“जनाधार मिळवण्याची धडपड”

दानवे म्हणाले की, मी महिनाभरापासून सांगतोय की, यांना संभाजीनगरात दंगल हवी आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. एमआयएमचा जनाधार कमी होत असल्यामुळे मुस्लीम लोकांचं मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी अशा पद्धतीची कृती होत आहे. तोच प्रकार भाजपा आणि आमच्यातल्या गद्दारांकडून (एकनाथ शिंदे गट) सुरू आहे. त्यांनादेखील दंगल हवी आहे. जनाधार मिळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: They want riot in sambhajinagar ambadas danve accused bjp aimim shivsena eknah shinde group asc
First published on: 30-03-2023 at 10:51 IST