सांगली : पलूस येथील पवार पाझर तलावात अज्ञात व्यक्तींनी विषारी पदार्थ टाकल्याने शेकडो मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या घटनेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हा तलाव परिसरातील अनेक शेतकरी, जलचर आणि पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास आहे. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेती अवलंबून असून, अनेक प्रकारचे जलचर आणि पक्षी या ठिकाणी आढळतात. मात्र, अज्ञातकडून या तलावात विषारी पदार्थ टाकल्यामुळे तलावातील शेकडो मासे मृत पावले आहेत. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे.
या घटनेमुळे तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत असून, यामुळे जलचरांच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तलावात विषारी पदार्थ टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावेळी माजी नगरसेवक दिलीप जाधव, शांताराम कांबळे, दीपक इंगळे, बाबुराव पवार, रामचंद्र पवार, सचिन कुंभार, संकेत कुंभार, विशाल कोळी, सुजल कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाकडे तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.
या घटनेमुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी. या तपासणीत पाण्यात कोणते विषारी पदार्थ टाकण्यात आल्याचे स्पष्ट होईल. तातडीने यांची दखल घ्यावी. आणि त्याचा तपासणी अहवाल जाहीर करावा अशी मागणी केली आहे.