सोलापूर : मोहरम उत्सवाला सोलापूरमध्ये स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभली आहे. अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून मोहरम उत्सव साजरा करताना सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा दिसून येतो. मोहरम आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधत पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीला चौपाड विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचा प्रिय असलेला तुळशीहार तेवढ्याच सश्रध्द भावनेने अर्पण करण्यात आला.

थोरला मंगळवेढा तालीम येथील प्रसिध्द बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मूळ मंगळवेढ्यातून सोलापुरात कसबा पेठेत राजपूत समाजातील दीक्षित कुटुंबीयांच्या ताब्यात आलेल्या या सवारीची पूजाअर्चा मुजावर कुटुंबामार्फत वंश परंपरेने केली जाते. या सवारीच्या प्रथम दर्शनाचा मान विमुक्त भटक्या वडार व अन्य उपेक्षित समाजाला दिला जातो. राजपूत, मराठा, धनगर, मुस्लिम, गवळी, लोणारी, गवंडी, सुतार, पिंजारी, मोची, बुरूड, माळी, सोनार, तेली, कोष्टी, कासार आदी समाजाच्या भाविकांची मोठी श्रध्दा आहे.

रविवारी सकाळी मोहरमच्या शहादत दिनी बडा मंगलबेडा सवारीची मिरवणूक हलगी, ताशा, संगीत बँडसह वाजत-गाजत निघाली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, अमर धंगेकर, अनिकेत पिसे, बिज्जू प्रधाने, सतीश प्रधाने, सुनील शेळके, धनराज दीक्षित, उज्ज्वल दीक्षित, रवींद्र दुबे, मिनाजुद्दीन काझी, विकास गायकवाड, मुदस्सर शेख आदींच्या उपस्थितीत निघालेला हा मिरवणूक सोहळा चौपाड मंदिराजवळ पोहोचला, तेव्हा आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी सवारीचेही दर्शन घेतले. विठ्ठलाला प्रिय मानला जाणारा तुळशीहारही मंदिरातून आणून सवारीला अर्पण केला गेला. मंदिराचे प्रमुख विश्वस्त रमेश खरात आणि मुख्य पुजारी नितीन कमलाकर कुलकर्णी यांनी ही सेवा रुजू केली. त्यानंतर सवारीच्या वतीनेही मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना तुळशीहार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले. कोणताही गाजावाजा न करता ही कृती तेवढ्याच सहजपणे झाल्याचे दिसून आले. वाटेत महिला भाविकांनी जलकुंभाद्वारे सवारीचे पदप्रक्षालन केले.

आसार शरीफ येथे भेटीचा विधी झाल्यानंतर सवारी पुन्हा वाजत गाजत थोरला मंगळवेढा तालीम भागात पोहोचली. कवी बदिउज्जमा बिराजदार यांनी फातेहाखानी अदा केली. मानकऱ्यांसह सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

शहरात सुमारे २५० पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले सहा दिवस विशिष्ट पंजांच्या मिरवणुका निघाल्या. बडे मौला अली, अकबर अली, घोडेपीर, दुर्वेश पंजे, तलवार पंजे, मुस्लिम पंजे आदी पंजांच्या मिरवणुका रितीरिवाजाप्रमाणे काढण्यात आल्या.