सावंतवाडी: सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी पहाटे लवकर उठून काम करणाऱ्या २० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी (PF) आणि वेतनासाठी झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कंत्राटदार संस्थेने ही कारवाई केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक पेट घेणार की शांत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावंतवाडी नगरपरिषद आणि कंत्राटदार संस्था यांच्यातील करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे २० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. संपात सहभागी झाल्यामुळे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
’रोजगार सेवा सहकारी संस्थे’ची कारवाई
सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम ‘रोजगार सेवा सहकारी संस्थे’कडे कंत्राटी पद्धतीने आहे. या संस्थेने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. कामाच्या अटींनुसार, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी होण्यास मनाई होती. मात्र, या अटींचे उल्लंघन करून काही कर्मचाऱ्यांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये बेमुदत संप पुकारला. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेळेवर पगार, पीएफ आणि ईएसआयसीची रक्कम जमा होत असतानाही त्यांनी संप केल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
’रोजगार सेवा सहकारी संस्थे’चे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर घाडगे यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही संस्थेने सांगितलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून संप करत आहात. यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने संस्थेवर दंडात्मक कारवाई केली आहे किंवा करणार आहे. त्यामुळे, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तसेच, दंडात्मक कारवाईमुळे संस्थेला झालेला आर्थिक भुर्दंड तुमच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारातून कपात करण्यात येईल.”
या पत्रात कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे, आगामी काळात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम आणि प्रभारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या भूमिकेकडे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.