अहिल्यानगर: पुण्यातील प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्याची हत्या करण्याचा कट येथील कोतवाली पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला. या संदर्भात पुण्यामध्ये गोळीबार करून फरार झालेल्या एकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ पिस्टल, ३४ जिवंत काडतुसे, तीन मोबाइल व एक स्विफ्ट मोटर हस्तगत करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज, गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले की, आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन राजू गाडे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, मुळ रा. गाडेवाडी, मुळशी, पुणे) व नवनाथ अंकुश ढेणे (वय २९, नवनाथ निवास, सुरभी कॉलनी रस्ता, आपटे सोसायटी, वारजे माळवाडी, हवेली, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रोहन गाडे हा १८ मे रोजी पुण्यामध्ये झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात फरार आहे. त्याने दयानंद शिंदेच्या टोळीतील अमित लकडे याच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. अमित लकडे याच्यावर गोळीबार होणार असल्याची माहिती बापू नायर टोळीतील स्वप्निल गुळवे (चॉकलेट) याने बाहेर फोडल्याचा संशय रोहन गाडे याला होता.

त्यातूनच स्वप्निल गुळवे याच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यासाठी रोहन गाडे व नवनाथ ढेणे हे मध्य प्रदेशातील उमरटी येथे जाऊन शस्त्र व काडतुसे घेऊन आले. हे गुन्हेगार नगर शहरातून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दराडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक गणेश देशमुख व कृष्णकुमार शेदवाड, बाळकृष्ण दौंड, अमोल गाडे, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके यांच्या पथकासह स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेजवळ आज दुपारी संशयित स्विफ्ट मोटर अडवून दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून ४ पिस्टल, २ मॅगझिन, ३४ जिवंत काडतुसे, तीन मोबाइल व मोटर असा एकूण ८ लाख ६६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

रोहन गाडे याच्या टोळीतील सहा जण कारागृहात आहेत. त्यांच्या माध्यमातून स्वप्निल गुळवे याच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दोघांनी दिल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.