माहूर तालुक्यातील अंजनखेड येथून बारावीचा पेपर सोडवून दहेली (ता. किनवट) गावातील आपल्या घराकडे जात असलेल्या तीन विद्यार्थ्यांची भरधाव दुचाकी एका झाडाला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, या दोघांचा मृत्यू झाला. तर गणेश तोटावार याच्यावर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा >>> “शिंदे गँगचे ९० टक्के खासदार..”, संजय राऊत यांचा मोठा दावा

हे विद्यार्थी दहेली तांडा येथील स्व. संगीताबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होते. तथापि परीक्षेचे केंद्र अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय आल्याने ते परीक्षेसाठी दुचाकीवरून ये-जा करत होते. २ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीतील पेपर देवून तिघेही  दहेलीकडे निघाले असता गावानजीकच्या एका वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी झाडावर आदळली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी दहेलीचे सरपंच राकेश तोटावर यांनी खाजगी वाहनाद्वारे जखमींना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेले. तर तेथे प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिकेतून यवतमाळ  येथे हलवले. दरम्यान यवतमाळ येथे पोचल्यानंतर यातील प्रतिक लेंडे व कृष्णा बोंतावार या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गणेश तोटावर या विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर दहेली गावावर शोककळा पसरली आहे.