वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शरद पवार गट आणि आम्ही असे सगळेजण आम्ही संपर्कात आहोत. आमच्यात कुठलाही तणाव किंवा बेबनाव नाही. आमच्या आता बैठका होणार नाहीत. जागावाटपाचं आमचं ठरलं आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे गटातल्या खासदारांबाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, ते निवडून येणार नाहीत. महाराष्ट्रात त्यांनी सत्तेचा आणि पैशांचा जो खेळ केला आहे तो इथल्या जनतेला मुळीच आवडलेला नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. आम्ही सामान्य उमेदवारांनाच सक्षम करतो. आमचे उमेदवार दहा लाखांचा सूट घालणारे नसतात असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
भाजपाकडे महाराष्ट्रात लढण्यासाठी उमेदवारच नाहीत
महाराष्ट्रात जे काही केलं आहे त्यामुळे भाजपाकडे लढायलाच माणसं नाहीत. महाराष्ट्रातून भाजपाच्या तिकिटावर कुणी लढू इच्छित नाही. अत्यंत गंभीर स्थिती या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची यादी तयार करणं भाजपासाठी सोपं नाही. त्यांचे विद्यमान खासदार आणि आमची फुटून गेलेली टोळी हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे हे भाजपाला माहीत आहे. नाशिकचे विद्यमान खासदार उभे राहिले तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
शिंदे गटाबाबत मोठा दावा
शिंदेंच्या गँगमध्ये गेलेले ९० टक्के खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. मात्र आम्ही कुणालाही पुन्हा घेणार नाही असंही वक्तव्य आज संजय राऊत यांनी केलं. तसंच भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर त्यांनी कडाडून टीका केली.