सातारा : औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अबू आझमी यांनी औरंगजेब याचे उत्तम प्रशासक असा गौरव केल्यानंतर राज्यात या वक्तव्याविरुद्ध पडसाद उमटत आहेत. हे वक्तव्याचा निषेध सुरू असतानाच औरंगजेब याच्या नावाने भरवल्या जाणाऱ्या उरुसाची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे माध्यमांशी बोलत होते.औरंगजेबाचे पूर्वज हे बाहेरून आलेले लुटारू, धर्मांध आणि आक्रमक असल्याचे सांगत उदयनराजे म्हणाले, की या औरंगजेबाने या देशातील प्रत्येक राजवटींना त्रास दिला, रयतेवर अत्याचार केले. धर्मांतरे घडवली. स्वतःच्या राजकीय महत्वकांक्षेतून सख्ख्या भावांची त्याने हत्या केली, वडलांना कैदेत टाकले, इथली मंदिरे, देवांवर त्याने हल्ले केले, आमची संस्कृती नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. तो आणि त्याचे पूर्वज हे फक्त हा देश लुटण्यासाठी आले होते. त्यांनी इथला देव, देश आणि धर्म बुडवण्याचे काम केले. असा हा माणूस आमच्यासाठी आदर्श कसा होऊ शकतो ? छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने त्रास दिला, त्यांचा अपमान केला. छत्रपती संभाजी महाराजांची ज्याने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. असे असताना या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात कशाला हवी. उलट त्या जागी एका क्रूर व्यक्तीच्या शेवटची ही जागा असेच स्मरण करून द्यायला हवे.

असे असताना सध्या काहींकडून त्याचा गौरव होतो, त्याच्या कबरीचे उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत. हे सगळे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच महाराष्ट्रातून उखडून टाकली पाहिजे असे मत  उदयनराजे यांनी व्यक्त केले. औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा हा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले तिथे चालते व्हावे.

औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पिलावळीने हे प्रकार थांबवावेत अन्यथा त्यांनी औरंगजेबाच्या मूळ देशात चालते व्हावे असा इशाराही उदयनराजे यांनी या वेळी दिला.दरम्यान महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्याविरोधात तातडीने कायदा करण्याच्या मागणीचाही उदयनराजे यांनी पुनरुच्चार केला.यावेळी सुनील काटकर, काका धुमाळ, प्रीतम कळसकर, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale statement in satara regarding aurangzeb tomb satara news amy