Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे. अनेक मुद्द्यावरुन राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच, गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शिक्षकांसाठी शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेही मैदानात उतरले आहेत. महायुती सरकार दिल्लीश्वरांचं गुलाम झालं आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

चार दिवसांपासून शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन

आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे मैदान सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला शरद पवारांनी जाहीर पाठिंबा दिला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी स्वतः मैदानात येत शिक्षकांशी संवाद साधला. तुमच्या पाठिशी आम्ही होतो आणि आहोतच हे लक्षात ठेवा असं म्हणत पुन्हा येईन वरुन त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मी तुम्हाला आज वचन द्यायला आलो आहे. आपलं सरकार असताना आपण जी गोष्ट हो म्हणून सांगितली होती. तुमच्या हक्काच्या गोष्टी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आपण नेहमी असं म्हणतो पितृ देवो भव, मातृ देवो भव, गुरु देवो भव. पण सत्ताधाऱ्यांना फक्त दिल्लीश्वर जे सांगतात ते ऐकायचं आहे, तोच त्यांचा गुरु आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय चालला आहे. महाराष्ट्रात भूमिपुत्र, मराठी माणूस यांना चिरडून टाकण्याचा विडा दिल्लीच्या गुलामांनी घेतला आहे. आपण आपली एकजूट करुन यांना असा धडा शिकवू की हे वळवळ करायला शिल्लक राहणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पुन्हा येईन वरुन देवेंद्र फडणवीसांना टोला

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मी आज तुमचं कौतुक करायला आलो आहे. तुम्ही एकजुटीने इथे जमला आहात. शिवसेना पूर्ण ताकदीने तुम्ही तुमचा लढा जिंकेपर्यंत तुमच्या पाठिशी आहे हे वचन द्यायला मी आलो आहे. विजयी मेळाव्याच्या मी पुन्हा येईन. पुन्हा येईन आता खरंतर फार बदनाम झालं आहे. पण मी नक्की येईन विजय उत्सव आपण एकत्र साजरा करु.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“विजयी मेळाव्याच्या मी पुन्हा येईन. पुन्हा येईन आता खरंतर फार बदनाम झालं आहे. पण मी नक्की येईन विजय उत्सव आपण एकत्र साजरा करु.” -उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्र सरकार आता शिक्षकांच्या या प्रश्नी नेमका काय निर्णय घेणार? त्यांचे प्रश्न सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.