१० जुलैला नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य पंचाहत्तरीबाबत होतं. पंचाहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही थांबावं असा असतो असं मोहन भागवत म्हणाले, यावरुन त्यांचा रोख मोदींकडे होता का? याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी यांना पंचहात्तरीची शाल मोहन भागवत घातली आहे-उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीची शाल मोहन भागवत यांनी घातलेली आहे. आता बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पावले आहेत ते कळेल आता. मोहन भागवतही निवृत्त होण्याच्या विचारात आहेत अशावेळी मोदी शब्द पाळतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात, आता यांची पावलं वाकडी पडतात का? ते कळेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

कदाचित मोदी निवृत्ती जाहीर करतील-उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील पण मग तुमचं मन कसं मोडणार वगैरे म्हणतील. मोदींनंतर कोण हा प्रश्न हा देशाचा विषय आहे तरीही तो अंतर्गत केला आहे. त्यामुळे मोदींनंतर कोण? याचा विचार सुरु झाला असावा. कदाचित त्याचं उत्तरही त्यांना मिळालं असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल त्यामुळेच मोहन भागवत निवृत्तीबाबत बोलले असावेत, ते बिना उत्तराचं काही बोलणार नाहीत. त्यांच्याकडे उत्तर असू शकेल.

आपल्याकडे सगळं एकतर्फी चाललं आहे-उद्धव ठाकरे

शिवसेना प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “मला वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो त्या पक्षाचा नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो. तो पंतप्रधान, मुख्यमंत्री झाल्यानंतर तो देशाचा झाला पाहिजे. आपल्याकडे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हा देशाचा पालक असतो. ती पद्धत आपल्याकडे अशी आहे. संविधानाचं पालन करुन तुम्ही सगळ्यांशी समान पद्धतीने वागलं पाहिजे. आता सगळं एकतर्फी चाललं आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पंचहात्तरीबाबतचं मोहन भागवत यांचं विधान काय?

“मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंचाहात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत यांनी हे विधान केलं.