कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. याप्रकल्पावरून समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. नाणारमधील रिफायनरी रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसू जागेचा पर्याय दिला होता, असा दावा उदय सामंत यांनी केला. मात्र, आता बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेनेही विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जैतापूर प्रकल्पावरून गंभीर आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जैतापूर येथील वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ नये याकरता कोळशावर उत्पादन करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. हा प्रकल्प जैतापूरला होऊ देऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, पैसे देतो, असं उद्योजक म्हणाले होते. मी विधानसभेतही बोललो आहे हे. ५ कोटी अॅडवान्स घेतले आणि ५०० कोटींचा व्यवहार झाला. लोकं अंधारात राहिले तरी चालतील, बेकारी आली तरी चालेल, कारखाने नाही आले तरी चालेल, पण पैसा आला पाहिजे आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचे. दुर्दैवाने म्हणावं लागतं यांना बाळासाहेबांचे चिरंजीव. बाळासाहेबांच्या नखाचीही सर नाही. यांना नाही कळणार राजकारण, येऊ द्या कोकणात त्यांना”, असं नारायण राणे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर आरोप केले.

हेही वाचा >> Video: “सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल कंपनीसाठी, मराठी माणसांवर…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

“संजय राऊत जनतेच्या हिताचा माणूस नाही”

संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. या पत्रकार परिषदेत ते सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढतात. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून नितेश राणे पत्रकार परिषद घ्यायला लागले आहेत, त्यावरून पत्रकारांनी आज नारायण राणेंना प्रश्न विचारला. त्यावर राणे म्हणाले की, “मी त्यांना ऐकत नाही. ऐकण्यासारखं काय असतं? जनहिताचे कोणते विचार व्यक्त केले? शिव्या घालणं, वेगवगेळ्या नावांनी डिवचणं. काय कार्यक्रम आहेत त्यांना? त्यांच्या मनात जे होतं ते सफल केलं. पवार साहेबांनी त्यांना काम दिलं होतं की शिवसेना संपवून दाखव. ते त्यांनी डन करून दाखवलं. संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा माणूस नाही. ते डिप्रेशनमध्ये जात आहेत. डोकं जागेवर नाही”, अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा >> “जम्मू ते दिल्लीच्या २२४ परप्रांतीयांच्या बारसूत जमिनी”, विनायक राऊतांचा दावा, म्हणाले, “दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की…”

“कोकणाच्या मुळाशी उठणारे प्रकल्प आणू देणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोकण रेल्वे मुळाशी उठली होती का? कोकण विमानतळ मुळाशी उठले होते का? त्यांना कोकणात येऊ दे, मग मूळ दाखवतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray to prevent jaitapur project from happening narayan ranes serious accusation sgk