औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे माजी आमदार व मनसेचे विद्यमान औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या शेजारी टपरी होती. ही टपरी काढण्यासाठी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आलेला आहे. या व्यक्तीने औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात लेखी तक्रार नोंदवत त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीबाबत चौकशी केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हर्षवर्धन जाधव हे मनसेचे माजी आमदार आहेत. २००९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यात हर्षवर्धन जाधव सुद्धा होते. औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. पण पाच वर्षाच्या आतच त्यांचे पक्षातंर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. २००९ ते २०१९ अशी दहा वर्षे कन्नडच्या जनतेने त्यांना विधानसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. हर्षवर्धन जाधव ही निवडणूक जिंकू शकले नाहीत. पण त्यांना मोठया प्रमाणात मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व एमआयएमचे इम्तीयाज जलील निवडून आले. त्यावरुन शिवसेना आणि त्यांच्यामध्ये वादावादी सुद्धा झाली. आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला असून, त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under atrocity act crime file on harshwardhan jadhav msr