मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतरही ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचे पहिले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान विषयक स्थितीमुळे किनारपट्टीला पावसाचा तडाका बसला. मुळात किनारपट्टीवर भात काढण्याची लगबग सुरू होती. हळवा म्हणजे कमी दिवसांत येणाऱ्या भाताची काढणी जवळपास उरकली होती. पण, देशी किंवा गरवा म्हणजेच जास्त दिवस लागणारा भात अजून कापणीला आला नव्हता. काहीसा ओलसर भात होता. दोन-चार दिवस उन्हाचा तडका बसला असता तर भात कापणीला आला असता. नेमक्या याच काळात जोरदार पाऊस झाला. जो भात दोन – चार दिवसांत कापणी आला असता, तो पुन्हा हिरवा झाला. वाळलेला भात सतत तीन – चार दिवस भिजल्यामुळे उभ्या भाताला कोंब आले. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण २५ ते ३० हजार हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. जो भात हाती लागला आहे तोही काळा पडला आहे किंवा त्याचा दर्जा खालावलेला आहे. कोकण किनारपट्टीवर भात हे मुख्य पीक आहे आणि नेमकं याच भात पिकाला फटका बसल्यामुळे कोकण किनारपट्टीवरील लोकांचं आर्थिक आणि शेतीचे गणित बिघड आहे.
भात नुकसान कमी म्हणून, आंबा नुकसानीची भर पडली. मुळात मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये किनारपट्टीवर थंडीची चाहूल लागते. दुपारी ऑक्टोबर हिटचा तडाखा, रात्रीची थंडी आणि मतलई वारे यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे अपेक्षित थंडी पडली नाही. जमीन ओलसर राहिली. मतलई वारेही सुरू झाले नाही, त्यामुळे आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया थंडावली आहे. सततच्या पावसामुळे आंब्याला कोवळी पाने आली आहेत, कोवळ्या पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर सुमारे महिन्याभराचा पाण्याचा ताण बसल्यानंतर म्हणजे जमीन कोरडी झाल्यानंतर, अपेक्षित थंडी पडल्यानंतर म्हणजे तापमान १७ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले आणि मतलई वारे सुरू झाले तरच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंब्याला मोहर येईल अशी स्थिती आहे. आंब्याचा मोहर जर – तर वर अवलंबून आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार साधारण आंब्याचा हंगाम महिना, दीड महिना लांबणीवर पडणार आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा मार्चअखेरीस बाजारात येईल. हापूस हंगाम किमान महिनाभर लांबणीवर जाणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून हंगाम सुरू होऊन जूनपर्यंत चालतो. मात्र, यंदा मार्च अखेरीस आंबा बाजारात येईल, त्यामुळे आंबा उत्पादकांना मिळणारा जास्तीचा दर यंदा मिळण्याची शक्यता नाही. तसेच उन्हाळी पाऊस लवकर झाल्यास काढणीला आलेल्या आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वादळी वारे, पाऊस झाल्यास आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आता हंगाम लांबल्यामुळे नुकसान होणार आहेच पण, अखेरीस वादळी पाऊस किंवा वादळामुळेही आंबा उत्पादकांचे नुकसान होणार आहे.
भात आणि आंबा हे किनारपट्टीवरील महत्त्वाची पिके आहेत, त्यातही आंबा हा अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. देशातून अमेरिकेसह युरोपीय बाजारपेठेत निर्यात होणाऱ्या मोजक्या फळांमध्ये हापूसचा समावेश होतो. त्यापासून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना चांगला पैसा मिळतो, देशांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. असे हे नगदी पिक यंदा हवा हवामान बदलामुळे अडचणीत आले आहे.
गत काही वर्षापासून अति उष्णता, पाऊस, वादळ वाऱ्याचा फटका आंब्याला बसतच आहे. पण, यंदा मोहोर येण्यापासूनच अडथळ्याची शर्यत सुरू झाली आहे. भारताने आंब्याच्या नुकसानीमुळे किनारपट्टीच्या शेतीला अवकाळी आहे.
