​सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगाम संपल्यानंतर कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमार या सर्वांचेच मोठे नुकसान केले आहे. ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान:

​कापणी झालेल्या भात पिकाला या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतात कापून ठेवलेले भात पीक जमिनीला भिडल्याने काही ठिकाणी त्याला कोंब फुटले आहेत. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले असून, गवत कुजण्याची भीती असल्याने पाळीव जनावरांसाठी चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसमोर गुरांना चारा कसा उपलब्ध करायचा, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

पर्यटन व्यवसायाला ग्रहण:

​सध्या पर्यटनाचा हंगाम असून दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने कुटुंबासह सिंधुदुर्ग किनाऱ्यावर येत असतात. मात्र, अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे पर्यटन व्यवसायावर पाणी पडले आहे. पर्यटकांच्या गर्दीने गजबजणारे किनारे ओस पडले आहेत. अनेक पर्यटक परतले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला असला तरी, पावसामुळे किल्ल्यावर जाण्यासाठीची होडी सेवा बंद ठेवण्यात आल्याने मालवणमधून पर्यटक निराश होऊन परतले. खाडीतील बोटिंग सफरीसाठी सज्ज झालेले ‘कायक’ देखील बंद ठेवण्याची वेळ या अवकाळी पावसाने आणली आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मच्छीमारी व्यवसाय थंडावला:

​चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी आपल्या होड्या किनाऱ्यावर सुरक्षित आणल्या आहेत. परिणामी मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मासे बाजारात कमी येत असल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे. मच्छीमार व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे.

पावसाची नोंद :

​आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात नोंदविण्यात आलेला पाऊस (मि.मी.मध्ये) :

देवगड १२, मालवण २८, सावंतवाडी ४१, वेंगुर्ला ३६, कणकवली ११, कुडाळ ४२, वैभववाडी ५, तर दोडामार्ग ५५ असून

आजचा सरासरी पाऊस २८.७५ मि.मी. इतका नोंदवला गेला आहे.

एकंदर, हंगामानंतर आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि जनजीवनावर विपरीत परिणाम केला असून, शेतकरी, बागायतदार आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.