महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख मिळत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांनी आमदारांना अपात्रतेची दिलेली दोन दिवसांची नोटीस अनधिकृत आहे. कमीत कमी दहा दिवसांची नोटीस द्यायला हवी होती, असा दावा शिंदे गटाकून करण्यात आला आहे. या दाव्यावर बोलत असताना नरहरी झिरवळ यांनी नियमाचा दाखला देताना सांगितले, “अपात्रतेची सात दिवसांपर्यंत नोटीस दिली जाते. त्यांना दोन दिवसांची नोटीस दिली असेल तर त्यांनी माझ्याकडे मुदतवाढ मागायला हवी होती. तशी कायद्यात तरतूद आहे. सात दिवसांच्या पुढेही त्यांना वेळ हवा होता, तर त्यांनी तो मागायला हवा होता.” तसेच जर उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. तर मग माझ्या अध्यक्षतेखाली झालेली नव्या अध्यक्षांची निवडही चुकीची ठरते का? असा प्रश्न नरहरी झिरवळ यांनी उपस्थित केला आहे.
हे वाचा >> महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील युक्तिवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
सरपंचावर देखील अविश्वास आणण्यासाठी बैठक घ्यावी लागते
“माझ्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे मी दिलेली नोटीस अनधिकृत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवर साध्या एका नोटीसीने अविश्वास येत नसतो. साध्या सरपंचावर अविश्वास दाखल करायचा असेल नोटीस द्यावी लागते. त्याची पडताळणी होते त्यानंतर ज्यांच्यावर अविश्वास दाखविला गेला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. माझ्यावर अविश्वास दाखल करायचा असेल तर सभागृहातच जावे लागेल, तरच तो अविश्वास दाखल होऊ शकतो. मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा माझ्यासमोर कोणताही गट नसतो. माझ्यादृष्टीने भाजपा, कुठलीही सेना किंवा इतर पक्षांसाठी मी उपाध्यक्षच असतो.”, अशी भूमिका नरहरी झिरवळ यांनी मांडली. टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली.
लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापेक्षा रोजचे प्रश्न महत्त्वाचे
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबद्दल बोलत असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, “हा निर्णय केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित राहणार नाही. आता जसे आसामच्या निकालाचा दाखला दिला जात आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बाबत जो काही निर्णय लागेल, त्याचा दाखल इतर राज्यांसाठी दिला जाईल. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत जो काही निर्णय लागायचा असेल तर तो लवकर लागला पाहीजे. कारण सर्वसामान्य लोक आम्हाला म्हणतात, हे लवकर बंद करा. कारण त्यांच्या प्रश्नांना महत्त्वच दिले जात नाही. रोज हा भांडला, तो त्यावर तंस म्हणाला, याच बातम्या येत असतात. यावर लोकांचे समाधान होत नाही. एवढे दिवस झाले अजूनही काही निर्णय लागत नाही. त्यामुळे हा निर्णय लवकराच लवकर लागला पाहीजे”, अशी अपेक्षा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली.
मी केलेली अध्यक्षांची निवड मग कशी चालते?
“माझ्यावर अविश्वास दाखवत असाल तर नव्या अध्यक्षाची मी निवड केली आहे. मग माझ्या अध्यक्षतेखाली निवड झालेल्या अध्यक्षांची निवड चुकीची आहे का? कारण मी अयोग्य असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली झालेली अध्यक्षांची निवडही अयोग्य ठरेल”, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.