महाराष्ट्रात शरद पवार यांनीच काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले, असा थेट आरोप  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी रविवारी केला. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेबांनी पवारांना उद्देशून ‘बारामतीकरांनीच’ राज्याच्या विकासाच खेळखंडोबा केला, अशी टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतले.
सरकारने जलसंपदा घोटाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी सुरू केल्यामुळे शरद पवार दुष्काळाचा प्रश्न घेऊन आंदोलनाला उतरले असल्याची घणाघाती टीका यावेळी बाळासाहेब विखे यांनी केली. मी शरद पवारांबद्दल बोलतो ती टीका नसून वस्तुस्थिती आहे. त्यांनीच राज्यातील काँग्रेसला पद्धतशीरपणे संपविण्याचे काम केले. अशोक चव्हाण वगळता सर्वच मुख्यमंत्री नेहमी पवारांच्या दबावाखाली असत, असा सणसणीत खुलासा विखे-पाटीलांनी यावेळी केला. याशिवाय, सहकाराचे फायदे उपभोगून झाल्यानंतर पवारांनी सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या मागच्यावेळच्या कर्जमाफीचे श्रेय पवार स्वतकडे घेतात. मात्र, कर्जमाफीचा तो प्रस्ताव मी मांडला होता, असा खुलासाही त्यांनी पत्रकारपरिषदेत केला.