सांगली : शिराळा तालुक्यातील चिखली येथील विश्वास कारखान्याने मागील हंगामात गाळपास आलेल्या उसासाठी प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यापूर्वी प्रतिटन ३ हजार २२५ रुपये ऊस उत्पादकांना एकरकमी दिले आहेत. वाढीव ५० रुपये दिल्याने उसाचा दर ३ हजार २७५ रुपये प्रतिटन देण्यात येत असल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
ते म्हणाले, विश्वासच्या संचालक मंडळाने कामगारांना १२ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्याबरोबर आज प्रतिटन ५० रुपये जाहीर करून कामगारांबरोबर शेतकरी यांचीही दिवाळी गोड होणार आहे. सन २०२४-२५ हंगामात साडेपाच हजार टन प्रतिदिनी प्रमाणे ४ लाख ४३ हजार १६ टन उसाचे गाळप केले. त्यातून ५ लाख ३२ हजार ७३० क्विंटल साखर उत्पादन झाले होते. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी सातत्याने विश्वास कारखान्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहे.
कारखान्यात १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान अनुदान, पतीवर खते व औषधे, एक रुपयात उसाचे बियाणे, माफक दरात कंपोस्ट व कारखाना बनवत असलेली द्रवरूप जिवाणू खते शेतकरी यांना दिली जात आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, या हेतूने आजवर कारखान्याने वाटचाल केली आहे.
श्री. नाईक म्हणाले, साखर कारखानदारीपुढे अनेक अडचणी आहेत. असमतोल पावसामुळे गेल्या काही वर्षांत उसासह सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा लागत आहे. साखरेच्या अस्थिर किमती, मागणीत घट, केंद्र सरकारचे निर्यात धोरण व केंद्राने उसाच्या खरेदी दरात केलेली वाढ व साखरेच्या विक्री दरात वाढ न केल्याने एकूण साखर व्यवसायापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
दूध बिलातील फरक बिले अदा
शिराळा येथील फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघामार्फत प्रतिलिटर म्हैस दुधासाठी २.४५ रुपये तर, गाय दुधासाठी १.४५ रुपये फरक बिल देण्यात येईल, अशी घोषणा संघाचे मार्गदर्शक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिगराव नाईक यांनी केली. यावेळी अध्यक्ष अमरसिंग नाईक, उपाध्यक्ष प्रकाश धस संचालक उपस्थित होते.
ते म्हणाले, दूध संघाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या ५० हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. मुंबईत दूध संघाच्या उत्पादनांना वाढती मागणी विचारात घेऊन नुकताच तुर्भे (मुंबई) संघाने येथे स्वतःच्या जागा घेऊन १७ कोटी रुपये गुंतवणूक करत ७५ हजार लिटर क्षमतेची डेअरी सुरू केली आहे.