पंढरपूर : आगामी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पंढरीच्या विठ्ठल -रुक्मिणीला शेकडो वर्षांपासून राजे महाराजांनी दान दिलेले शेकडो ऐतिहासिक दागिने गोठविण्याचे काम आज मंगळवारी सुरू करण्यात आले. यातून दागिन्यांची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि पडताळणी केली जाते. ऐतिहासिक ठेवा असलेले हिरे, माणिक, मोती, पाचूसह सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आहेत. यामध्ये विठ्ठलाचे जवळपास २५५ तर रखुमाईचे १०१ दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

पंढरीचा विठ्ठल आणि रुक्मिणी हे केवळ महाराष्ट्राचेच नाहीतर अवघ्या देशवासीयांचे दैवत आहे. या देवतांना ऐतिहासिक काळापासून अनेक राजे महाराजांनी मौल्यवान भेटींचे दान दिले आहे. यातील दागिने, अलंकार नवरात्र उत्सवावेळी देवाला परिधान केले जातात. या निमित्ताने या दागिन्यांना गोठवण्याचे काम आजपासून सुरू केले आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणीला मिळालेल्या या भेटींमध्ये शिवकालीन, पेशवेकालीन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शिंदे घराणे यांच्यासह अनेक मराठा राजे, सरदार यांनी दिलेले सुंदर आणि मौल्यवान दागिने आहेत. हे दागिने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ताब्यात आहेत. हे सर्व दागिने नवरात्र, दिवाळी, दसरा यांसारख्या सण,उत्सवात देवाला परिधान केले जातात.

यामध्ये श्री. विठ्ठलाचे सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत.

तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचे वाळे, पैंजण, साडी, कंबरपट्टे, माजपट्टा, रत्नजडित पेट्या, हिरे, माणिक, पाटल्या, मोत्यांच्या व रत्नजडित जडावांच्या बांगड्या, गोठ, तोडे, हातसर आहेत. गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार, चपलाहार, पेट्यांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, जवाच्या माळा आणि हायकोल सूर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांच्या कोंदणात बसवलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या अमूल्य ठेव्याचे जतन करण्याचे काम या गोठविण्याच्या प्रक्रियेतून केले जात आहे.

गोठविणे म्हणजे काय?

गोठविण्याच्या प्रक्रियेतून या ऐतिहासिक दागिन्यांची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि पडताळणी केली जाते. यातील अलंकारांचे रेशीम धागे आवश्यक असल्यास बदलले जातात. हे काम नवरात्र उत्सवापूर्वी वर्षांतून एकदा समितीच्या देखरेखीखाली आणि कुशल कारागिरांकडून केले जाते.