सातारा : वळीव आणि धुवाधार पावसाने साताऱ्यातील टंचाई संपली. त्यामुळे टँकर मे महिन्यातच बंद झाले आहेत. जिल्ह्यात ८० गावे आणि ४५० वाड्या तहानलेल्या होत्या. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच्या उन्हाळ्यातील मे महिन्यातच प्रथमच जिल्ह्यातील टँकर बंद झाले आहेत.
जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाई असतेच. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत ८० गावे आणि ४५० वाड्यांच्या घशाला कोरड पडलेली. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच काही भागांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पण, वळवाचा पाऊस धुवाधार पडल्याने जिल्ह्यातील सर्वच टँकर मे महिन्यातच बंद झालेत. इतिहासात प्रथमच असे घडले आहे.
सातारा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कराड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाई वाढते त्यामुळे मान, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्यात अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जादा पाऊस पडणाऱ्या वाई तालुक्यातही टंचाई जाणवते त्यामुळे तेथेही पाणीपुरवठा करावा लागतो. मागील वर्षी सरासरीच्या १२५ टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला होता तरीही सातारा जिल्ह्यात लवकरच पाणी टंचाईला सुरुवात झाली त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता मागील दहा दिवसांत वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे जिल्ह्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले आहेत.
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत ७८ टँकर टंचाई निवारणासाठी धावत होते. यामधील शासकीय ५ तर खासगी ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण, आता हे सर्व टँकर बंद झाले आहेत.
साताऱ्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई होती. माण, खटाव, फलटण यांसह जिल्ह्यात इतरत्र ७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आवश्यक त्या ठिकाणी विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पावसाने पाणी पातळीत वाढ झाल्याने टँकर बंद करण्यात आले आहेत. अधिग्रहित विहिरींचे अवलंबित्व कमी करण्यात आले आहे.
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा