अलिबाग – रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला देखील बसला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. माणगाव जवळ महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

मुंबई गोवा दुरावस्थेचे भोग सरण्याची चिन्ह दिसत नाहीत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. सोमवारी संध्याकाळपासून माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत होते . त्यामुळे महामार्ग पाण्याखाली गेला होता. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्यातून वाट काढत वाहने हळूहळू पुढे सरकत होती. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अशी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर प्रथमच असं पाणी बघितल्याचं तिथले रहिवासी सांगत आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. ठेकेदार बदलून ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने घेतला असला तरी बाह्यवळण रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणगाव परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते.

महामार्गावर पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच कुचकामी

मुंबई गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तिथे पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुकेळी खिंडीत अशाच प्रकारे दीड ते दोन फूट पाणी महामार्गावर साचल्याच पाहायला मिळाल होत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पेण, हमरापुर, तारा येथील पुलांवर पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. याशिवाय आपटा फाटा आणि कर्नाळा खिंड येथेही पाणी साचत असल्याच्या तक्रारी आहेत.कोकणात राज्यातील इतर भागांच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो त्यामुळे रस्त्यांची बांधणी करताना पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सक्षम ठेवणे गरजेचे होते. मात्र रस्त्याचे बांधकाम करताना याचा विचार केला गेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत.

अपघाताची शक्यता…

महामार्गावरील पाणी साचण्याच्या घटनांमुळे अपघात होण्याची भीती वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे. वेगाने येणाऱ्या गाड्या पाण्यात शिरल्याने गाड्यांवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे.