भाजपाचे कणकवलीतील उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या समोर कोणाचं आव्हान नसल्याचं एकप्रकारे म्हटलं आहे. कितीही खालच्या दर्जाची टीका झाली तरी होऊ द्या, आपल्या बाजुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भरभक्कम दिग्गज नेते आहेत, तर समोरचे मैदान साफ आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग येथील वैभवाडीतील प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी नितेश राणे यांनी म्हटले की, ही निवडणूक मी इथल्या तरूणांच्या भविष्यासाठी लढवतो आहे. मला कोणावर टीका करायची नाही. टीका करण्यासाठी मी निवडणूक लढवत नाही. माझं आव्हान वैभववाडीचा विकास करण्याचं आहे. येथील तरूणांची बेरोजगारी संपवण्याचे आहे. शेतकऱ्यांना बळकट करायचं आहे, माता-भगिनींच्या हाताला काम द्यायच आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत. त्या शंभर टक्के आमच्या वैभवाडीतील लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत. यासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे. तसेच आमचे उद्दिष्टच वेगळे आहेत. ध्येय वेगळे आहे. म्हणून मी पत्रकारांना सांगतो की, आमची उद्दिष्ट, ध्येय बदलली आहेत, आता तुम्ही पण सकारात्मतेने आम्हाला पाठिंबा द्या असेही ते यावेळी म्हणाले.

त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की,  होऊ दे खालच्या दर्जाची टीका, आपल्या बाजूने पंतप्रधान मोदी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आपल्या बाजूने नारायण राणे, विनोद तावडे, प्रविण दरेकर आहेत. एवढी भरभक्कम नेते मंडळी आपल्या बाजूने असताना, समोरचं मैदान साफ आहे. एवढ्या मातब्बर लोकांसमोर उभं राहणार कोण? त्यांना उत्तर देणार कोण? त्यामुळे समोर कुणीच नसल्याचंही त्यांनी एकप्रकारे सांगितलं. तसेच, मागील पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी, वैभववाडीकरांना मी कधीच नाही म्हणालेलो नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.