मराठा आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका अशी आक्रमक भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. त्यासाठी विविध आंदोलनंही करण्यात येत आहेत. आजच छत्रपती संभाजी नगरमध्येही आंदोलन करण्यात आलं तसंच नागपूरमध्येही आंदोलन करण्यात येतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना याविषयी विचारलं असता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“राज्य सरकारची ही भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. ओबीसींचं आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. कुणालाही त्यात वाटेकरी होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे की जे काही आंदोलन त्यांनी सुरु केलं आहे ते मागे घ्यावं. कुठल्याही प्रकारे आंदोलन करु नये. आज मी संभाजीनगरमध्ये गेलो होतो तिथल्या ओबीसी आंदोलकांचीही भेट घेतली. त्यांनाही मी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. माझा विश्वास आहे की ते आंदोलन मागे घेतील. नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांनाही मी विनंती करणार आहे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं होतं. त्यांचं उपोषण दोन दिवसांपूर्वी मागे घेण्यात आलं आहे. मात्र त्यावेळी कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असं प्रमाणपत्र देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. आंदोलन अद्यापही सुरुच आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरीही आंदोलन मागे घेणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांना मराठा आरक्षण देणार हे आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर ओबीसी समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण दिलं तर आम्ही सहन करणार नाही. नेमकं काय सांगून उपोषण मागे घेण्यात आलं आहे हे आम्हाला माहित नाही असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की ओबीसी आरक्षणात कुठलाही वाटेकरी नसेल. तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will not share obc reservation with maratha said devendra fadnavis scj