छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागात मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली असून, काही ठरावीक पट्ट्यात दररोजच पावसाची हजेरी आहे. परिणामी वाफसा होत नसून, पेरणीही रखडली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जेमतेम ४० टक्क्यांपर्यंतच पेरण्या झाल्या आहेत. काही भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा असल्याने तेथेही पेरण्या झालेल्या नाहीत. देहू- आळंदी, पैठणच्या मुख्य पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांपुढे आधी वारी की पेरणी, असा पेच निर्माण झालेला आहे.
विभागीय कृषी सहसंचालक डाॅ. प्रकाश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात जेमतेम ४० टक्क्यांच्या आतच पेरण्या झालेल्या आहेत. तर वैजापूरचे कृषी अधिकारी विशाल साळवे यांच्या माहितीनुसार काही भागांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. काही ठरावीक पट्ट्या, मंडळांमध्येच पाऊस झालेला असून, जेथे पाऊस झाला, तेथे वाफसा होत नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. तर काही भागांत पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मराठवाड्यात मागील चार दिवसांत वादळीवाऱ्यासह अनेक भागांत पाऊस झालेला आहे. १० जून रोजी नांदेडच्या नऊ मंडळांमधये अतिवृष्टी झालेली आहेत. ११ जून रोजी नोंदलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात १०.२ मिलीमीटर पाऊस झालेला असून, मराठवाड्यात १३ जून रोजीपर्यंत एकूण १०३.१ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
पैठणहून १८ रोजी पालखीचे प्रस्थान
संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आषाढी एकादशीसाठी १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ५ जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. पालखीत घोडा रिंगण रंगणार असून, चार रिंगण सोहळ्यातील पहिले रिंगण २१ जून रोजी मिडसावंगी, दुसरे २५ जून रोजी पारगाव घुमरे, तिसरे २८ जून रोजी तर चौथे रिंगण १ जुलै रोजी कव्हेदंड या गावी होईल.