Gopichang Padalkar on Milk Adulteration: दुधात भेसळ होते की नाही? झाली तर कोणत्या प्रकारची होते? आपल्या घरात येणारं दूध हे चांगलं आहे की भेसळयुक्त? दूध कधी अचानक पातळ किंवा कधी घट्ट का येतं? असे अनेक प्रश्न आपल्याला रोजच्या रोज पडत असतात. कारण दुकानातून आणलेली दुधाची पिशवी किंवा डेअरीतून थेट घरपोच येणारं दूध या दोन माध्यमातूनच बहुतांश घरांमध्ये दूध पोहोचत असतं. पण याच दुधाबाबत अनेकदा संशय वा शंका निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते, याचं प्रात्याक्षिक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानभवनाबाहेर दिलं आहे!
गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत हे आज दूध भेसळीचं साहित्य घेऊन विधानभवन परिसरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते, याचं सादरीकरण केलं. यासाठी मिक्सर, दूध पावडर, पाणी आणि इतर साहित्य एका टेबलवर मांडून या दोघांनी तिथेच दोन पद्धतींनी दुधात भेसळ करून जादा दूध तयार करून दाखवलं.
दुधात भेसळ कशी होते?
गोपीचंद पडळकर म्हणाले, “तीन प्रकारे दूध भेसळ होते. केमिकल हा पहिला प्रकार. केमिकल आणि थोडी दूध पावडर टाकली तर २५० मिली दुधाचं १ लिटर दूध होतं. दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल आणि दूध पावडर टाकली की गाईचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं. तिसऱ्या प्रकारात केमिकल, चुना आणि पाणी टाकलं की भेसळ होते”, असं सांगून पडळकरांनी तिथेच यातील दोन प्रकारांची भेसळ करून दाखवली.
भेसळीमुळे २५० मिली दुधाचं १ लिटर दूध होतं!
“एक विशिष्ट केमिकल, दूध पावडर आणि पाणी असं मिश्रण एकत्र केलं की २५० मिली दुधाचं एक लिटर दूध होतं. मी हे सगळं साहित्य इस्लामपूरमधून आणलं. हा विषय राजकारणाचा नाही. हा लोकांच्या आरोग्याचा विषय आहे. पावडर टाकल्यानंतर या मिश्रणाचा एसएनएफही वाढतो. त्यामुळे हे लोक १ रुपयाची वस्तू चार रुपयाची तर एका टँकरचे तीन टँकर दूध करतात. या मिश्रणातून तयार होणारं दूध आत्ता म्हशीची किंवा गायीची धार काढल्यासारखं तयार होतं. ताज्या दुधाप्रमाणे या दुधावर फेसही तयार होतो”, असं म्हणत पडळकरांनी हे प्रत्यक्ष करूनही दाखवलं.
दुधात भेसळीसाठी स्वयंपाकाचं तेल!
दरम्यान, भेसळीसाठी स्वयंपाकाचं तेलही वापरलं जात असल्याचा दावा पडळकरांनी केला. “२०० मिली दूध टाकलं. त्यात स्वयंपाकाचं तेल टाकलं. तेल फॅटसाठी टाकतात. या मिश्रणाचा रंग दुधासारखा राहावा यासाठी चुना टाकतात. तुम्ही तंबाखू खात नसाल, तरी रोज दुधातून चुना खाताय. त्यानंतर या मिश्रणाला दुधासारखाच वास यावा म्हणून विशिष्ट प्रकारचं केमिकल टाकलं जातं. यातून एका लिटरचं दूध थेट १० लिटर केलं जातं. यात एसएनएफ मानकानुसार यावा म्हणून दुधाची पावडरही टाकली जाते”, अशी प्रक्रिया सांगून पडळकरांनी हे सर्व विधानभवनाबाहेर करूनही दाखवलं.
दरम्यान, केमिकलचं नाव सांगितलं तर इतर लोकही हे प्रयोग करायला लागतील, असं म्हणून त्यांनी भेसळ केलं जाणारं केमिकल सांगण्यास नकार दिला.
तुम्ही लहान बाळांना हे दूध पाजताय – पडळकर
“मुंबईतल्या गोठ्यांमध्ये सामान्य नागरिकांना आत जाऊ दिलं जात नाही. ते दूध बाहेर आणून देतात. कितीही गिऱ्हाईकं आली, तरी तिथे दूध मिळतच असतं. हे कसं? शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळायला हवा म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. मुंबई-पुण्यात लहान बाळांनाहे दूध पाजलं जातंय. आपण कधीच पिऊ शकत नाही असे केमिकल्स दुधात मिसळले जात आहेत. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला दुधाचा दर मिळत नाही आणि इथे कष्ट करून जो नागरिक दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. मधले लोक गब्बर होत आहेत. एका टँकरचे तीन टँकर करतात. पाणी ओतायचं, केमिकल ओतायचं, पावडर टाकायची. झालं”, अशा शब्दांत पडळकरांनी गंभीर दावा केला आहे.
कशाचं किती प्रमाण टाकायचं याचा फॉर्म्युलाही ठरलेला!
“कोणत्या घटकाचं किती प्रमाण टाकायचं हे ठरलेलं आहे. आम्हाला हे सगळं इस्लामपूरमध्ये मिळालं. तिथे एक मोठी दूध डेअरी आहे. एका मोठ्या पुढाऱ्याची. मी राजकारण म्हणून बोलत नाही. शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधीतरी तांब्याभर पाणी टाकत असेल एवढंच. तेही तिथे डेअरीवर मशीनमध्ये दिसतं. डेअरीवाले मोठ्या प्रमाणावर भेसळ करून गब्बर झाले आहेत. भेसळ थांबली तर शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळेल”, असा मुद्दा गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांच्या सादरीकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय माध्यमांशी बोलताना जाहीर केला. “गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे. या दुधाच्या माध्यमातून लोकांना विष पाजण्याचं काम होत असेल, तर हे सहन करण्याचं कारणच नाही. यासाठी मी स्वत: एफडीए, आरोग्य अशा विभागांची बैठक घेणार आहोत. याबाबत एक धडक कारवाई आम्ही करणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.