Devendra Fadnavis on Nagpur Riots : सोमवारी दोन गटांत नागपुरात उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “घटनेच्या अनुषंगाने आज नागपूरचे पोलीस आयु्क्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सर्व गोष्टींसदर्भातील ही आढावा बैठक होती. यासंदर्भात मुळातच काही गोष्टी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली, त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, प्रतिकात्मक कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जळाली, अशाप्रकराचा एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव तायर झाला.”

नागपूर दंगलीप्रकरणी ९२ लोकांना अटक

“जमावाने तोडफोड केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी जवळपास ४-५ तासांत या संपूर्ण दंगलीवर आवर घातला. त्याकरता अश्रूधुराच्या नळकांड्या आणि इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक पोलिसांनी केल्या. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील चित्रिकरण, पत्रकारांनी केलेले चित्रिकरण यात जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. १०४ लोकांना ओळखण्यात आले असून ९२ लोकांना अटक केली असून काही लहान बालकांवरही कारवाई सुरू आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भडकवणारे पॉडकास्ट करणाऱ्यांनाही दिला इशारा

“जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ही घटना घडावी म्हणून पोस्ट ज्यांनी केलीय त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी केलं जाणार आहे. जवळपास ६८ पोस्ट ओळखण्यात आल्या असून डिलिट केल्या आहेत. अजून काही पोस्टची माहिती घेणं चालू आहे.. भडकवणारे पॉस्टकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल”, असंही ते म्हणाले.

दंगा करण्याचा प्रयत्न केला तर…

“काही निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधांमुळे जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावर परिणाम होतोय. त्यात शिथिलता आणावी हा प्रयत्न आहे. यामुळे पोलीस सजग राहणार आहेत. कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर अतिशय कडक कारवाई केली जाईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

…तर दंगेखोराची प्रॉपर्टी विकणार

“आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार आहे. अशा गोष्टी महाराष्ट्रात सहन केल्या जाणार नाहीत. अशाप्रकारेच दंगेखोरांना सरळ केलं जणार आहे”, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sold activists property warn by cm devendra fadnavis on nagpur violence sgk