सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तिचे अपंग पती, चार महिन्यांची मुलगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावले. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली.
शमिका शशांक पवार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती शशांक प्रकाश पवार (वय ४०), मुलगी पवित्रा आणि मुलगा प्रभास हे या अपघातातून बचावले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्टिगा कार चालकाचे नाव राहुल शर्मा असे असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी की, पवार कुटुंबीय आपल्या सुझुकी मोपेडवरून कणकवलीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांनी महामार्गावर अचानक लेन बदलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा कारने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोपेडच्या मागे बसलेल्या शमिका पवार रस्त्यावर आपटल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस आणि कसालचे सरपंच राजन परब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.