लातूर : मंगळवारी सायंकाळी शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर एका तरुणाला पाच-सहा जणांनी बेदम मारहाण केली व ते दुचाकी वर बसून पळून गेले. शंभर -दीडशे लोक झाला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते मात्र कोणीही त्यांना अडवले नाही. पोलिसांनी अवघ्या चार तासात त्यापैकी चार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या व रस्त्यावरून त्यांची वरात काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेले .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी सायंकाळी काही तरुण अंबाजोगाई रस्त्यावरील एका बारमध्ये बसले होते .बार मधून ते बाहेर आल्यानंतर रस्त्यावर जाणाऱ्या एका तरुणाला त्या पाच-सहा जणांनी बेदम मारहाण केली,दगडाने मारले तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना सगळ्यांनीच दुचाकीवरून पोबारा केला. संबंधित तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले हा सगळा प्रकार रस्त्यावर सुरू असताना बघ्याची मोठी गर्दी होती पण कोणीही त्यात त्या तरुणाला मारहाण होत होती त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आरोपी पाच-सहा जण तरुण, तगडे व आक्रमक होते त्यामुळे कोणीच त्याला अडवण्याचे धाडस केले नाही.

पोलिसांनी चार तासातच त्यापैकी चार जणांना पकडले व भर रस्त्यावरून त्यांची वरात काढत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. या प्रकारानंतर शहरात झाले ते चांगले झाले पोलिसांची दहशत असलीच पाहिजे अशी चर्चा सुरू होती. लातूर शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते व या शहरात रस्त्यावर भर दिवसा मारहाण होते व आरोपी पसार होतात हा प्रकार शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढवणारा होता. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांची रस्त्यावरून वरात काढली या प्रकारामुळे काही प्रमाणात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man was beaten on ambajogai road four accused were arrested within hours sud 02