सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी हल्लीची तरूणाई कोणत्याही थराला जात आहे. सोशल मीडिया हेच ज्यांना सर्वस्व वाटते, ते प्रसिद्धीसाठी नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी हे उद्योग अंगलटही येतात. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील एका सर्पमित्रानं प्रसिद्धीसाठी चक्क वन्य प्राण्याला वेठीस ठरले. नागपंचमीच्या दिवशी सापाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका सापाला केक भरविण्याचा आणि त्याच्यासमोर ज्वलनशील पदार्श पेटविण्याचा प्रयत्न या युवकाने केला.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित असलेल्या नागाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्ररकरणी आता संबंधित युवक अडचणीत सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज नामक युवकाने २९ जुलै २०२५ रोजी नागपंचमी निमित्त नागाला केक खाऊ घालून वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला. ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली.

सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर आणि वनक्षेत्रपाल बोराडी प्रादेशिक यांनी सांगवी व बोराडी रेंज स्टाफच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या घरातून दोन प्लास्टिक बरण्या (सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या) आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ आणि ५१ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराडीचे वनक्षेत्रपाल किरण गिरवले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, चौकशीत आरोपीने सदर नाग हा शिरपूर तालुक्यातील बुडकी गावातील घराजवळून पकडून आणला आणि नागपंचमीच्या दिवशी वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री जंगल भागात सोडल्याचे कबूल केले आहे. आरोपीस अटक करून शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.