40 Years Ago Inder Thakur Lost His Life In Air India Flight : १२ जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण करताच कोसळले. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला.
या विमान अपघातावर संपूर्ण जगाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात अनेक लोकांना संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी गेल्याचे दु:ख सोसावे लागले. याआधीही जगात अनेक विमान अपघात झाले आहेत, ज्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
चाळीस वर्षांपूर्वी एका बॉलीवूड अभिनेत्याबरोबरही असेच काहीसे घडले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब विमानातून प्रवास करत होते. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नदियां के पार’ चित्रपटातील अभिनेते इंदर ठाकूर, जे भूतकाळातील प्रसिद्ध अभिनेते हिरालाल ठाकूर यांचे पुत्र होते, त्यांनाही विमान अपघातात आपले प्राण गमवावे लागले.
इंदर ठाकूर यांचा विमान अपघातात मृत्यू
१९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नदियां के पार’ हा चित्रपट सर्वांना आठवेल, ज्यामध्ये सचिन पिळगावकर यांनी चंदनची भूमिका केली होती. ‘नदिया के पार’ या चित्रपटात ओंकारची भूमिका साकारणारे इंदर ठाकूर केवळ ३५ वर्षांचे होते तेव्हा विमानात झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेता असण्याबरोबरच ते फॅशन डिझायनर आणि मॉडेलदेखील होते. त्यांचे लग्न प्रिया नावाच्या हवाई सुंदरीशी झाले होते आणि त्यांना एक मूलही होते. पण, २३ जून १९८५ हा तो दुर्दैवी दिवस होता जेव्हा इंदर त्यांच्या पत्नी आणि मुलासह टोरंटोहून इंग्लंडला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट १८२ मध्ये चढले आणि त्यांच्या कुटुंबासह त्यांचा मृत्यू झाला. इंदर ठाकूर यांची कहाणी खूप वेदनादायक आहे.
२३ जून १९८५ रोजी इंदर ठाकूर आणि त्यांची पत्नी व मुले एअर इंडियाच्या फ्लाइट १८२ मधून प्रवास करत होते. विमान लँड होण्यासाठी ४५ मिनिटे शिल्लक होती; पण त्यापूर्वीच दहशतवाद्यांनी विमान बॉम्बद्वारे उडवून दिले, ज्याचा निर्धारित केलेल्या वेळेनुसार स्फोट झाला आणि एक मोठी दुर्घटना घडली.
या विमान बॉम्बस्फोटात विमानातील एकूण ३०७ प्रवासी आणि २२ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. जेव्हा स्फोट झाला तेव्हा विमान समुद्रावरून जात होते, त्यामुळे सर्व मृतदेह आणि विमान समुद्रात पडले. इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला, परंतु फक्त १३२ मृतदेह सापडले. अभिनेता आणि त्याची पत्नी आणि मुलाचा मृतदेह सापडला नाही.