बॉलीवूडमध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खान यालाही पान खाण्याचा मोह आवरता आला नाही. आमीरने एक, दोन नव्हे तर चक्क पन्नासहून अधिक पाने खाऊन पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या वेळी हा प्रयोग त्याने बहुचर्चित ‘पीके’साठी केला आहे.
एखाद्या कलाकाराला आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी भूमिका करायला नक्कीच आवडते. ती भूमिका अधिकाधिक जिवंत व्हावी, म्हणून तो कलाकार विशेष प्रयत्नही करत असतो. त्यातही तो कलाकार जर ‘आमीर खान’ असेल तर त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी जे जे काही करता येईल ती ती प्रत्येक गोष्ट आमीर करतो. मग त्यासाठी आपली ‘चॉकलेट बॉय’ही इमेज पुसण्याचीही त्याची तयारी असते. रंगभूषा, वेशभूषा आणि एकूणच देहबोलीत आमीर आमूलाग्र बदल करतो आणि आमीरचे चाहते आणि बॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठीही त्याचा तो ‘अवतार’ खरोखरच पाहण्यासारखा असतो.
आमीर खानच्या ‘पीके’ या बहुचíचत चित्रपटाच्या ‘त्या’ पोस्टरवरून आमीर खान चर्चेत आला होता. कदाचित तो चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी केलेला खटाटोपही असेल. पण आमीर आणि त्याच्या ‘पीके’ची हवा जोरदार झाली. या चित्रपटाशी संबंधित काही किस्से आता बॉलिवूडमध्ये चर्चिले जात आहेत. भूमिका अस्सल व्हावी आणि वास्तव वाटावी, त्यासाठी पन्नासहून अधिक पाने खाण्याचा प्रयोगही त्यातीलच एक आहे.
पान खाण्याचे आपण शौकिन नाही किंवा पान खाण्याची सवयही नाही. पण ‘पीके’मधील भूमिकेसाठी आपण पन्नासहून अधिक पाने खाल्ली असल्याचे आमीर सांगतो. चित्रीकरणाच्या वेळी सेटवर खास पानवाला बोलाविण्यात आला होता. तो त्याच्या स्टाईलने पान तयार करायचा आणि भूमिकेची गरज म्हणून आमीर पान खायचा. चित्रीकरणाच्या वेळी एका दिवसात आमीरने पन्नास ते साठ पाने खाल्ली असल्याचे सांगण्यात येते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात आमीरसह अनुष्का, सुशांतसिंह राजपूत, संजय दत्त आदी कलाकार आहेत. आमीर खान या चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan new experiment in pk