बॉलीवूड अभिनेता आमिर खानला द परफेक्शनिस्ट या नावानंही संबोधलं जातं. याचं कारण म्हणजे त्याची चित्रपटांप्रति असलेली जिद्द, सर्जनशीलता, त्याच्या चित्रपटांमध्ये असलेलं वेगळेपण आणि कुठलीही कथा, विचार अचूकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न. आजवर त्यानं अनेक चित्रपटांमधून विविध विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे आमिर खानचा एक वेगळा ऑरा असल्याचं जाणवतं. पण, आता हा द परफेक्शनिस्ट अभिनय क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त त्यानं नुकतीच ‘राज शामानी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये आमिर खानला, “जर आमिर खान त्याच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट बनवत असेल, तर तो कशावर असावा, असं वाटतं”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिर म्हणाला, ”माझं एक स्वप्न आहे की, मला महाभारतावर आधारित चित्रपट बनवायचा आहे आणि या चित्रपटाच्या (सितारे जमीन पर) प्रदर्शनानंतर मी त्यावर काम सुरू करणार आहे. ते एक काम आहे, ते एक प्रोजेक्ट असं आहे की, जे केल्यानंतर कदाचित मला असं वाटेल की, आता मी अजून काहीच करू शकणार नाही. कारण- ते कामच असं आहे. ज्यामध्ये सगळं काही सामावलं आहे. ज्या ज्या गोष्टी जगात आहे, ती ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला महाभारतात सापडते.”
पुढे आमिर त्याबद्दल बोलताना म्हणाला, “खरं तर माझी इच्छा आहे की, काम करता करता मला मरण यावं. पण जेव्हा तुम्ही विचारलं आहे की, शेवटचा चित्रपट कोणता असेल? तर मला असं वाटतं की, हा चित्रपट असू शकतो, जो केल्यानंतर मला असं वाटू शकतं की, आता यानंतर मला काहीच करायचं नाहीये.” पुढे त्याने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. आमिर म्हणाला, “हा चित्रपट तुम्हाला आनंद देईल. हा चित्रपट पाहिल्यानंतर आनंद वाटतो, असं माझं मत आहे. ‘तारे जमीन पर’मध्ये आम्ही तुम्हा लोकांना खूप रडवलं; पण यामधून आम्ही तुम्हाला खूप हसवणार आहोत आणि या माध्यमातून एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री जिनिलीया देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘सितारे जमीन पर’ हा ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा पुढचा भाग आहे.