Malavika Mohanan shares Horrific Incident of Mumbai Local : दैनंदिन जीवनात मुली आणि महिलांना अनेक नकोशा प्रसंगाचा सामना करावा लागतो. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना छेडछाडीचे प्रकारही घडतात. एका अभिनेत्रीबरोबर असंच घडलं होतं, तेही मुंबईच्या लोकलमध्ये. एका तरुणाने तिच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं, असा खुलासा तिने केला आहे.
नुकताच श्रीलीलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ती कार्तिक आर्यनबरोबर एका इव्हेंटला जात असताना गर्दीत एका व्यक्तीने तिला ओढलं होतं. आता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिला लोकलमध्ये आलेला वाईट अनुभव सांगितला. हा प्रसंग तिच्या कॉलेजच्या दिवसात घडला होता. त्या घटनेनंतर ती घाबरली होती.
मालविका मोहननने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं की आता तिला इतर शहरांपेक्षा मुंबईत जास्त सुरक्षित वाटतं; कारण तिच्याकडे स्वतःची कार आणि ड्रायव्हर आहे. पण रोज सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या इतर अनेक महिलांच्या बाबतीत असं नाही. “मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे, असं लोक अनेकदा सांगतात, पण मला हा दृष्टिकोन बदलायचा आहे. आता माझी स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर आहे, त्यामुळे मला कोणी विचारलं की मुंबई सुरक्षित आहे का? तर मी कदाचित हो म्हणेन. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या महिलांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं,” असं मालविका म्हणाली.
मालविकाने सांगितला वाईट अनुभव
मालविका तिच्या कॉलेजच्या दिवसात घडलेला एक प्रसंग सांगितला. मालविका म्हणाली, “मी एकदा माझ्या दोन जवळच्या मैत्रिणींसह लोकलने घरी परतत होती. त्यावेळी साधारण रात्रीचे ९.३० वाजले होते आणि आम्ही फर्स्ट क्लास डब्यात होतो. डबा रिकामा होता. बोगीत आम्हा तिघींशिवाय कोणीच नव्हतं. मी खिडकीजवळ बसले होते. तिथे एक मुलगा आला, त्याने पाहिलं की फक्त तीन मुली बसल्या आहेत. तो खिडकीच्या अगदी जवळ आला आणि जवळजवळ त्याने माझा चेहरा खिडकीच्या जाळीवर ढकलून ‘मला एक किस देशील का?’ असं विचारलं.”
काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नव्हतं – मालविका
मालविका मोहननने सांगितलं की या घटनेचा तिला व तिच्या दोन्ही मैत्रिणींना मोठा धक्का बसला. त्या तिघी स्तब्ध झाल्या होत्या. अशा परिस्थितीत काय प्रतिक्रिया द्यायला हवी हे त्या वयात कळत नव्हतं, असं मालविका म्हणाली. यावेळी मालविकाने जर तो उडी मारून ट्रेनमध्ये शिरला असता, तर काय झालं असतं? असा प्रश्न विचारला. मालविका मोहननने म्हटलं की ही फक्त एक घटना होती. रोज सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या महिलांबरोबर अशा प्रकारच्या छेडछाडीच्या अनेक घटना घडत असतात.
मालविका मोहननच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच Hridayapoorvam मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मोहनलाल यांचीही भूमिका आहे.