Zareen Khan On Marriage : सोशल मीडियाद्वारे अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना लग्न करण्यासाठी आग्रह करताना दिसतात. चाहत्यांच्या या मागणीला कलाकार मंडळी अनेकदा मजेदार पद्धतीने उत्तर देतात.
असेच काहीसे अभिनेत्री झरीन खान हिच्याबरोबर झाले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनय आणि मनमोहक सौंदऱ्याने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे झरीन खान.
झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले; परंतु हिंदी चित्रपटांमधील तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही. अभिनेत्रीचे व्यावसायिक जीवन चांगले नव्हते आणि तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात ब्रेकअपचे दुःखदेखील सहन केले. झरीन ३८ वर्षांची आहे. ती अजूनही सिंगल आहे. झरीन खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
झरीन खान तिच्या लग्नाबद्दल काय म्हणाली?
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये झरीन खान म्हणतेय की, मी इन्स्टाग्रामवर माझ्या व्हिडीओंवर, माझ्या पोस्टवर काही कमेंट्स वाचल्या आणि एक कमेंट अशी आहे, ज्याने खूप लक्ष वेधून घेतले. तुम्हाला माहीत आहे का ती कमेंट कोणती? ‘म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?’ यावर अभिनेत्रीने हसून कमेंटला उत्तर दिले आणि म्हणाली की, लग्न केल्यानंतर मी तरुण होईन का?
पुढे झरीनने लग्न न करण्याची कारणे सांगितली. ती म्हणाली, “आजकालच्या काळात लग्नं फार काळ टिकत नाहीत. अनेक जण फक्त दोन-तीन महिने एकत्र राहतात आणि मग वेगळे होतात. नातेसंबंधांमध्ये सच्चेपणा, समजूत व समर्पणाची कमतरता आहे. लोक आता स्वाइप करून नाती निवडतात, जणू काही खाद्यपदार्थ मागवतो तसं. त्यात माणसाची किंमतच उरलेली नाही.”
झरीन पुढे म्हणते, “मग मुलगा असो वा मुलगी, हाताबाहेर गेले, जे आपल्या समाजातील पालकांना सर्वांत मोठी भीती असते की, मूल हाताबाहेर गेले आहे, तर त्यावर उपाय म्हणजे त्यांचे लग्न करणे. लग्न म्हणजे काही जादू आहे का की, जर तुम्ही त्यांचे लग्न केले, तर सर्व काही ठीक होईल. कारण- मी पाहते की, आजकाल बहुतेक लग्ने दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. मला वाटत नाही की लग्न हा सर्व समस्यांवर उपाय आहे.”
झरीन खान ३८ वर्षांची आहे आणि आता ती एकटीच जीवन जगत आहे. ती बिग बॉस स्पर्धक शिवाशीष मिश्राबरोबर तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती; परंतु २०२४ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. तेव्हापासून ही अभिनेत्री एकटीच जीवनाचा आनंद घेत आहे.