Ajit Pawar and IPS Officer Anjana Krishna Call Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अजित पवारांनी फोन करुन अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास थांबवण्यास सांगितल्याचा दावा या व्हिडीओमधून करण्यात आला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली.

अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या कथित व्हिडीओच्या वादावरून सध्या राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अशातच आता यावर ‘बिग बॉस मराठी ५’मधील स्पर्धक आणि महाराष्ट्रात ‘छोटा पुढारी’ म्हणून लोकप्रिय असलेला घन:श्याम दरवडेनेही त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरांत पोहोचलेला घन:श्याम सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय विषयांवरील व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

अशातच त्याने अजित पवार आणि आयपीएस अधिकारी यांच्या संभाषणाच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या व्हिडीओत घन:श्याम म्हणतो, “आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना मनापासून सलाम. सर्वसामान्यांचा आवाज उठवणारा अधिकारी कसा असावा हे अंजना यांनी दाखवून दिलं आहे. ‘कारवाई थांबवा, मी कोण आहे?, मला ओळखत नाही का?, मी उपमुख्यमंत्री आहे, मी काय करू शकतो’ असे फोन आले. पण ताई म्हणाल्या तुम्ही कोणीही असा मला त्याची फिकीर नाही. मी कारवाई करणार म्हणजे करणार… ताई तुमच्या याच जिद्दीला आणि कर्तृत्वाला मनापासून सलाम करतो.”

यानंतर घन:श्याम म्हणतो, “बाकीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा अंजना कृष्णा यांचा आदर्श घेतला पाहिजे. अधिकारी कसे असावेत, तर अंजना कृष्णा यांच्यासारखे असावेत. महाराष्ट्र नव्हे; तर देशभरातून तुमचं कौतुक होत आहे आणि अनेकजण तुमच्या पाठीशी आहेत. अजितदादा तुम्ही जे विधान केलं. आता भले म्हणाल की, आम्ही त्यांचेच माणसं आहोत. पण जिथे चूक आहे, तिथे चूक बोललंच पाहिजे. अजितदादांचे शब्द बघितले का? मी कोण आहे? मला ओळखलं का? आणि नंतर दादा म्हणतात, शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी मी हे म्हणलो. हे हसण्यासारखं वाक्य आहे.”

घन:श्याम दरवडे इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे घन:श्यामने म्हटलं, “अजितदादा तुमची भाषा चुकीची होती आणि ती रणरागिनीसुद्धा नडली. ती तुम्हाला घाबरली नाही. तुम्ही ज्याची बाजू घेतली, तो बघा काय करतोय. महाराष्ट्रासमोर त्याचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंजना कृष्णा ताई तुमच्यासारख्या अधिकऱ्यांच्या महाराष्ट्राला गरज आहे; कारण अधिकारी कसे असावेत हे तुम्ही दाखवून दिलंत. काही माणसांनी टीका केली की, त्यांचे कागदपत्रं तपासा. मी तर म्हणतो, टीका करणाऱ्यांनी त्यांची डिग्री तपासा. मग त्या अंजना ताईवर बोला. अंजना तुमच्या कर्तुत्वाला आणि तुमच्या धाडसाला माझा आणि महाराष्ट्रातील जनतेचा सलाम.”