बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा सिनेमा ९ ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. मात्र अक्षयच्या ‘बेल बॉटम’ सिनेमावर तीन अरब देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सिनेमातील एका दृश्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचं म्हंटलं जातंय.
अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ सिनेमावर सौदी अरब, कुवेत आणि कतार या तीन देशांमध्ये बंदी घालण्यात आलीय. या देशातील सेन्सॉर बोर्डांनी सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतल्याचं वृत्त आहे. यामुळेच या सिनेमाच्या प्रदर्शनाला या देशात परवानगी नाही.
हे आहे कारण
सूत्रांच्या माहितीनुसार यूएई सेन्सॉर बोर्डाने या सिनेमात तीनही देशांची प्रतिमा खराब दाखवण्यात आल्याचा दावा करत सिनेमावर बंदी घातली आहे. तसचं या सिनेमात काही ऐतिहासिक घटनांमध्ये देखील बदल केल्याचा सेन्सॉर बोर्डाचा आरोप आहे. या सिनेमात लाहोरहून विमानाचं अपहरण करून ते दुबईत आणलं जातं आणि जिथे भारतीय अधिकारी एक सिक्रेट मिनश पूर्ण करतात असं दाखवण्यात आलंय. तर यूएई सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्यानुसार संयुक्त अरब अमीरातचया फोर्सने या अपहरणकर्त्यांना पकडलं होतं. तसचं यूएईच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांने या प्रकरणात दखल दिली होती. असं म्हंटलं जातंय. मात्र सिनेमात वेगळी स्थिती दाखवण्यात आल्याचं म्हणत या तीन देशात सिनेमावर बंदी घालण्यात आलीय.
‘बेल बॉटम’ सिनेमात अक्षय कुमारसोबत लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत आहेत.