बॉलीवूडचा आयकॉनिक चित्रपट ‘धडकन’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी व सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला २००० मध्ये प्रदर्शित झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट डिजिटली रीमास्टर आवृत्तीत परत येत आहे. चला तर मग जाणून घेऊ हा चित्रपट कधी आणि कसा पाहू शकतो ते.
‘धडकन’ पुन्हा होणार प्रदर्शित
२००० मध्ये प्रदर्शित झालेला ‘धडकन’ हा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रेम, त्याग व कुटुंब यांचे संमिश्रण असलेल्या कथेने प्रेक्षकांना प्रभावित केले. आता हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
‘धडकन’ पुन्हा प्रदर्शित होण्याच्या या बातमीने चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “वाह, मी हा चित्रपट थिएटरमध्ये नक्कीच पाहण्यासाठी जाईन.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “देव, अंजली व रामची प्रेमकहाणी पुन्हा पाहणे खूप मजेदार असेल.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “हा क्लासिक चित्रपट पाहणे माझ्यासाठी खूप मजेदार आहे.”
‘धडकन’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीने ‘अंजली’ची भूमिका साकारली होती. तर, सुनील शेट्टीने तिचा प्रियकर ‘देव’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमारने शिल्पाचा पती ‘राम’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात किरण कुमार, कादर खान व परमित सेठी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परमितची खलनायकाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. चित्रपटाची स्टारकास्ट आणि कथेव्यतिरिक्त गाण्यांनाही खूप पसंती मिळाली होती.
‘दिल ने ये कहा है दिल से’, ‘अक्सर इस दुनिया में अंजाने मिलते हैं’, ‘ना ना करते प्यार’, ‘दूल्हे का सेहरा सुहाना लगता है’ व ‘तुम दिल की धडकन’ यांसारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. नदीम-श्रवण यांचे संगीत आणि समीर यांच्या गीतांनी चित्रपटाला एव्हरग्रीन बनवले. हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आणि कालांतराने त्याला लोकप्रियता मिळाली. २५ वर्षांनंतर ‘धडकन’चे पुनरागमन जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. चाहते नवीन प्रेक्षकांबरोबर पुन्हा एकदा त्या गोड आठवणींच्या दुनियेत रमण्यास उत्सुक आहेत.