बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या बहुप्रतिक्षीत ‘अतरंगी रे ‘ सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमात अक्षयसोबतच सारा अली खान आणि धनुष हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरु आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सिनेमातील त्याचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय या फोटोतून अक्षयचा नवा अवतार पाहायला मिळतोय. अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तो एका जादूगाराच्या वेशभूषेत दिसून यतोय. सोनेरी नक्षी असलेाला लाल रंगाचा मखमली कोट, डोक्यावर हॅट आणि हाताच राजाचा पत्ता असा अक्षयचा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. जादूगाराच्या लूकमधील अक्षयच्या फोटोला काही तासातचं आठ लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.
अक्षय कुमारने हा फोटो पोस्ट करत एक पोस्ट लिहली आहे. “आज अंतरंगी रे चा शेवटचा दिवस होता. आनंद एल यांची जादू अनुभवण्यासाठी प्रतिक्षा करणं कठीण आहे. शिवाय माझे सह कलाकार सारा आणि धनुषचेही आभार त्यांनी मला या सुंदर सिनेमात सहभागी होऊ दिलं.” अशा आशयाची पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.
अवघ्या काही तासातच अक्षय कुमारचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या सिनेमातील अक्षयचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. शिवाय फोटोतील अक्षयचा लूक आणि त्याचं गूढ हास्य पाहून अक्षयची भूमिका नेमकी कशी असेल याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आनंद एल राय यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. कारण या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष हे कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहे. येत्या 6 ऑगस्टला ‘अतरंगी रे’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.