Alia Bhatt On Daughter Raha : आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक प्रभावी चित्रपट दिले आहेत आणि तिच्या दमदार अभिनयाने ती अजूनही लोकांची मने जिंकत आहे.
आलिया भट्ट आणि वरुण धवन नुकतेच काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शो ‘टू मच’मध्ये दिसले होते. मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक मनोरंजक खुलासे केले. यावेळी काजोलने आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. आलियाने तिच्या मुलीला १८ वर्षांची झाल्यावर कोणती भेटवस्तू देणार हेदेखील सांगितले. आलिया तिची मुलगी राहासाठी ईमेल लिहिते. त्याशिवाय काजोलने विचारले की, ती याचे श्रेय करण जोहरला देते का, तर आलियाने काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
काजोल विचारते, “आम्ही ऐकले आहे की, तू तुझ्या बाळासाठी दररोज ईमेल लिहितेस. तुला ही कल्पना ‘कुछ कुछ होता है’मधून मिळाली का? याचे श्रेय करण जोहरला द्यायला हवे का?” त्यावर आलिया उत्तर देते, “नाही. मला ही कल्पना माझी मैत्रीण आरती आणि दुसऱ्या एका व्यक्तीने दिली. कोणीतरी मला सांगितले की, ते हे त्यांच्या बाळासाठी करतात आणि हो, मी ते दररोज लिहीत नाही, तर दरमहा लिहिते.”
आलिया पुढे स्पष्ट करते की, ती फोटो आणि एका ओळीसह ईमेल लिहिते, “राहा, १८ वर्षांची झाल्यावर किंवा तिनं लवकर मागितल्यास, १३ किंवा १४ वर्षांची झाल्यावर मी तिला देईन.”असं आलिया म्हणाली.
आलियाला विचारण्यात आलं की, तिची आई सोनी राजदाननंही असंच केलं होतं का? आणि तिने उत्तर दिले, “नाही; पण मला ही कल्पना खूप आवडली म्हणून राहाच्या जन्मानंतर मी ती स्वीकारली.” ट्विंकलने विनोदाने म्हटले, “सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे बाळ झाल्यावर तुम्ही गोष्टी विसरत नाही.” आलिया म्हणाली, “तिची आई सोनी राजदान तिला नेहमी सांगायची की, पालक छोट्या छोट्या गोष्टी विसरतात. ती म्हणायची, ‘तुम्ही किती विसरता याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल,’ आणि आता मला कळते की, ते खरे आहे.”
आलिया आणि रणबीरने नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची मुलगी राहाचे स्वागत केले. २०२३ मध्ये कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचमध्ये या जोडप्याने पहिल्यांदा त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवला, जो लगेचच व्हायरल झाला होता.
आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे. तिच्याकडे ‘अल्फा’देखील आहे, जो २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. शिव रवैल दिग्दर्शित, अल्फा हा YRF स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट आहे.