अमृता खानविलकरचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात रिलीज झाला होता. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी ‘चंद्रा’ गाण्याला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे, आज चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष झाले तरीही या गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. ‘चंद्रा’ गाण्याने यूट्यूबवर नव्या रेकॉर्ड केला आहे. यासंदर्भात अभिनेत्री अमृता खानविलकरने खास पोस्ट शेअर करीत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
‘चंद्रा’ हे गाणे श्रेया घोषालने गायले असून अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच चित्रपटात ही लावणी दिपाली विचारे यांनी कोरिओग्राफ केली होती. २९ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘चंद्रा’ हे गाणे चित्रपटाच्या १ महिनाआधी रिलीज करण्यात आले होते, तेव्हापासूनच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता यूट्यूबवर या गाण्याने तब्बल २०० मिलियन व्ह्यूज मिळवत गाण्याने नवा रेकॉर्ड बनवला आहे. यासंदर्भात एव्हरेस्ट मराठी आणि अभिनेत्री अमृता खानविलकरने पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.
“प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या चंद्रा गाण्याला यूट्यूबवर २०० मिलियन व्ह्यूज” अशी पोस्ट शेअर करीत एव्हरेस्ट मराठीने गाण्यासी संबंधित सर्वांना टॅग केले आहे. तसेच मूळ गाण्याला २०० मिलियन ह्यूज मिळाल्याने चित्रपटाच्या टीमने ‘चंद्रा’ गाण्याचा ‘लिरिकल व्हिडीओ’ प्रदर्शित केला आहे. यावर अमृताने “मी कायम ऋणी आहे…” अशी कमेंट केली आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘चंद्रा’ हे गाणे या चित्रपटाचे शीर्षक गीत होते. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित आहे.